एक दिवशीय लाक्षणिक उपोषणास गावक-यांसह महिलाही उपस्थित! शेतच कुंपण खातय तर दाद मागायची कोणाकडे?
रामभाऊ जगताप, महान्यूज लाईव्ह
मंगळवारी (ता. २०) वासुंदे, ता. दौंड येथील श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयासमोर त्याच शाळेच्या एक महिला शिक्षिका उपोषणाला बसल्या..त्यांच्यासमवेत गावकरीही उपोषणाला बसले..! का? तर वस्तुस्थिती त्यांना माहिती होती.. त्या महिला शिक्षिकेवर अन्याय झाला होता.. हा अन्याय कोणी केला? महिला शिक्षिका सांगते की, शिक्षण संस्थेने व शिक्षण विभागाने केला..!
वासुंदे (ता दौंड) येथील या शाळेसमोर राजश्री मधुकर भोसले या महिला शिक्षिकेने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खरात हेही त्यांच्यासमवेत उपोषणाला बसले होते.
गेली २० वर्षे या महिला शिक्षिकेला अगदी वेठबिगाराप्रमाणेच वागणूक दिल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांच्यानंतर सेवेत आलेल्यांच्या मान्यता संस्थेने आणल्या, मात्र भोसले या ज्येष्ठ असूनही त्यांचा विचार झाला नाही. विनावेतन वेठबिगारासारखे काम गेली २० वर्षे करीत असल्याचे भोसले यांचे म्हणणे आहे.
बोगस कागदपत्रांच्या आधारे शिक्षण विभागातून मान्यता आणलेल्या शिक्षकांना तात्काळ निलंबित करावे व संस्थेच्या भ्रष्ट व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी या उपोषणादरम्यान करण्यात आली. यासाठी आपण जीवात जीव असेपर्यंत लढा देणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
एकदिवसीय उपोषणाने हलकट बनलेला शिक्षण विभाग जागा होईल?
पुण्याच्या जिल्हा परीषदेतील शिक्षण विभागातील भ्रष्ट साखळी अनेक शिक्षण संस्थांमध्ये पोचली आहे. गेली अनेक वर्षे सेवाज्येष्ठता, रोश्टर अशा अनेक गोष्टींना कात्रजचा घाट दाखवत शिक्षकांच्या मान्यता दिल्या गेल्या.. अशा शिक्षण संस्थाही बिनधास्तपणे आजही सुरूच आहेत. निर्लज्ज कर्मचारी व उदासीन अधिकाऱ्यांचा भरणा असलेल्या शिक्षण विभागाला अशा राजश्री भोसले सारख्यांच्या एका दिवसाच्या उपोषणाने जाग येईल का? हा खरा प्रश्न आहे.
संदीप जांबले, माहिती सेवा समिती अध्यक्ष दौंड – शिक्षण विभागाचा एकही अधिकारी, संस्थेचा पदाधिकारी या उपोषणाकडे फिरकत नाही, यावरूनच आडदांडपणा शिक्षण विभागात किती आहे याची प्रचिती येते.