मुंबई – महान्यूज लाईव्ह
पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर सर्वात भीषण असा बीएफ-७ या प्रकारचा कोरोनाचा व्हेरिएंट भारतातही आढळला आहे, अमेरिका, इंग्लंडमध्येही त्याने हातपाय पसरायला सुरवात केली आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझरचा वापर पुन्हा सुरू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात महत्वाची बैठक घेऊन काही मार्गदर्शक सूचना लागू केल्या असून राज्यांनीही स्वतंत्रपणे बैठका घेऊन याचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे.
राज्यात आरोग्य विभागाच्या माहितीनुसार १३२ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या परिस्थितीवर सध्या लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थात नागरिकांनी घाबरू नये, मात्र काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रात १०० टक्के जिनोम सिक्वेसिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लसीकरण, बुस्टर डोसवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग व रॅंडम सॅंपलिंग करण्याच्या सूचना दिल्या असून दवाखान्यांमधील ऑक्सिजन प्लॅंटही कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पंढरपूर येथील मंदीर प्रशासनाने नो मास्क, नो एन्ट्री केली आहे. अंतर ठेवून दर्शन रांगेत घेण्याची सूचना केली आहे. शिर्डीतही मास्क अनिवार्य करण्याता आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.