शिरूर : महान्यूज लाईव्ह
दारूच्या नशेत निर्घृणपणे खून करून महिलेचा मृतदेह नदीत फेकून देणाऱ्या आरोपीस शिरूर पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना केलेल्या तांत्रिक तपास करत आरोपीस गजाआड केले आहे.
याबाबत सविस्तर असे की, बाभूळसर बुद्रुक (ता. शिरूर) येथील संगीता आडके ही महिला दुपारच्या सुमारास दि.९ रोजी शेळ्या चरण्यासाठी नदीच्या कडेला गेली होती. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्या महिलेचा शोध घेतला असता सदर महिलेचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात मयत स्थितीत आढळून आला होता.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेत पंचनामा करून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण गुन्हे शाखा तसेच शिरूर पोलिस गेले दहा दिवस अहोरात्र मेहनत घेत होती.
घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हाती घेत विविध बाबींचा बारकाईने अभ्यास करत परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले.तसेच घटनास्थळी कुठलाही ठोस पुरावा नसताना क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करणे हे मोठे आव्हान होते, मात्र तरीही पोलिसांनी कसून तपास सुरू ठेवला.
तपासादरम्यान एका व्यक्तीची हालचाल संशयास्पद दिसून आल्याने पोलिसांनी सदर व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदर आरोपी गावात घटना घडल्या पासून दिसला नसल्याची माहिती मिळाली. तत्काळ पोलिसांनी सदर व्यक्ती ऊसतोड कामगार असून ऊस तोडकामगार प्रमुखाच्या साहाय्याने जालना येथे तपास पथक आरोपीच्या शोधार्थ रवाना झाले.
पोलिसांनी अखेर मोठ्या शिताफीने आरोपी अतिश संतोष प्रधान(वय.२०, रा. जोडवालसा, ता. भोकरदन, जि.जालना) यास ताब्यात घेतले. आरोपीने पोलिसांकडे लाकडी दांडक्याने दारूच्या नशेत खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून सदरचा गुन्हा कोणत्या कारणाने केला याचा पोलिस शोध घेत आहेत.
हा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, स्नेहल चरापले, पोलिस नाईक नाथसाहेब जगताप,पोलिस अंमलदार रघुनाथ हलनोर, सहायक फौजदार राजेंद्र साबळे, योगेश गुंड, राजाराम गायकवाड, प्रवीण पिठले, पोलिस मित्र दीपक बढे, होमगार्ड राहुल चौगुले यांच्या पथकाने केली आहे.