नागपूर : महान्यूज लाईव्ह
आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांना बोलू न देण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असा निर्लज्जपणा करू नका असे म्हटले आणि त्यावरून जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले.
आज अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेचे अधिवेशन कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाकडून आमदार भास्कर जाधव यांना बोलण्यास देण्याची विनंती करण्यात आली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावली. त्यावरून विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली.
त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना थोडे बोलण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. सत्ताधारी बाकावरून 14 जण बोलले आहेत, त्यांना परवानगी मिळाली. विरोधी बाकाकडून मी फक्त एकटा बोललो आहे. अशा पद्धतीने कसे सभागृह चालवता आहात? आज फक्त भास्कर जाधव यांना बोलू द्या म्हटले तर तुम्ही ऐकत नाही. विरोधी पक्षाचे देखील ऐकत नाही. तुम्हाला सभागृह चालवायचे नाही असेच एकंदरीत दिसते. आमची विनंती आहे असे अजित पवार म्हणाले.
त्यानंतर जयंत पाटील यांना बोलू द्यावे अशी मागणी करण्यात आली. 14 सदस्य समोरच्या बाजूला बोलले आहेत, चौदा वेळा कामकाज तहकूब करण्यात आले आहे. आमच्या एका सदस्याला बोलू दिले जात नाही. अध्यक्ष महोदय तुम्ही सदस्यांचा जीव घ्याल असे भास्कर जाधव म्हणाले.
त्याचवेळी जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून असा निर्लज्जपणा तुम्ही करू नका असे म्हटले आणि त्यावरून सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सत्ताधारी सदस्यांना देखील आयते कोलीत मिळाले आणि त्यांनी जयंत पाटील यांचे निलंबन करण्याची मागणी केली.
त्यानंतर जयंत पाटील यांचे विधानसभा अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले. दरम्यान या निलंबनावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांत दरम्यान वाद पेटला असून उद्या राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने विविध जिल्ह्यात निदर्शने केली जाणार आहेत.