सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
ग्रामपंचायत निवडणूकीत आमचे १८ सरपंच निवडून आले, त्यात बोरीही आपलीच असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आणि इकडे बोरीत संताप उसळला.. बोरीतील नवनिर्वाचित सरपंच मंदा विजय ठोंबरे यांच्यासह एकही सदस्य भाजपच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हता असे बोरीतील पदाधिकाऱ्यांनी सांगत आताही विधानसभा निवडणुकीत बोरीच धूळ चारणार आहे असा इशारा भाजपला दिला.
बोरी गावामुळेच आपली आमदारकी गेली असे अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आणि आता बोरीत भाजपचे सदस्य असल्याचे स्पष्ट केले. मात्र आज बोरीच्या नवनिर्वाचित सरपंच मंदा विजय ठोंबरे व मयूर विजय ठोंबरे यांनी आम्ही राष्ट्रवादीचेच असल्याचे सांगत गावातील दोन्ही गटांनी राष्ट्रवादीच्याच नावाने मते मागितली आणि आम्ही दोन्ही गट राष्ट्रवादीचेच असल्याचे स्पष्ट केले.
छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सरपंच रामचंद्र जोरी, ज्ञानेश्वर जोरी, भारत शिंदे म्हणाले, बोरीतील निवडणूक राष्ट्रवादीच्याच दोन गटात झाली. इंदापूर तालुक्यात तुझे तेही माझेच म्हणण्याची जुनी सवय आहे. अशा या लबाडीमुळेच हर्षवर्धन पाटील यांना मतदारांनी धूळ चारली होती आणि जर बोरीमुळे पराभव झाला असेल, तर आताही तेच होणार आहे याची पक्की खूणगाठ त्यांनी बांधावी. बोरी गावातील एकही सदस्य कालच्या भाजपच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हता, तरीही बोरी गावचा सरपंच भाजपचा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले, हे फक्त दुर्दैवी नाही, तर कायम लबाडीचाच कार्यक्रम असल्याचे द्योतक आहे.
अधिवेशनानंतर राष्ट्रवादी करेल दूध का दूध.. पाणी का पाणी..
दरम्यान राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही असे स्टेजवर अनेक जणांना बोलावून सांगणार नाही, विरोधकांच्या गावचे ही सरपंच आमचे, असे म्हणणार नाही. आमचे सरपंच थेट समोर असतील आणि संपूर्ण तालुक्याला हे समोर दिसेलच.