इंदापूर – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात २६ गावांच्या निवडणूका झाल्या, त्यामधील १८ ग्रामपंचायती भाजपच्या आल्या आहेत असा दावा भाजपने केला होता. तर राष्ट्रवादीने १५ गावांवर दावा केला होता, काल भाजपने त्या १८ ग्रामपंचायतींचे सरपंच उभे करून दाखवले. आता राष्ट्रवादी काय करते याची उत्सुकता आहे. मात्र याच कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी महत्वाचे वाक्य सांगितले, ज्या गावामुळे माझी विधानसभा गेली, त्या बोरीत आज भाजपचे सदस्य आहेत असे सांगून पाटील यांनी आगामी विधानसभेच्या विजयाचे संकेत दिले आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी नवनिवार्चित सरपंचांच्या सत्कार सोहळ्यात इंदापूर तालुक्यातील सर्व रस्त्या्ंच्या कामांचे ऑडिट करणार असल्याचे सांगून राष्ट्रवादीला इशारा दिला आहे, तर दुसरीकडे पालकमंत्र्याच्या परवानगीशिवाय आता कोणतीच भूमीपूजने करता येणार नाहीत असा फतवाच असल्याचे सांगत श्रेय घ्यायचेच नाही असा इशारा दिला आहे.
इंदापूर तालुक्यात २६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या, त्यामध्ये भाजपने १८ तर राष्ट्रवादीने १५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला होता. मागील वेळी राष्ट्रवादीने तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत थेट सरपंचांची शिरगणती केली होती. आता भाजपने हा डाव राष्ट्रवादीवर पलटवताना मतमोजणीच्या दुसऱ्याच दिवशी सरपंचांची शिरगणती केली. यामध्ये भाजपने आत्मविश्वास दाखवत हा कार्यक्रम आयोजित केला, मात्र राष्ट्रवादीने तशी हालचाल दाखवलेली नाही.
आता हर्षवर्धन पाटील यांचा या विजयाने आत्मविश्वास दुणावला असून त्यांनी एक किस्सा सांगितला. तालुक्यातील बोरी या एकाच गावाने केलेल्या एकतर्फी मतदानामुळे आपला विधानसभेतील विजय दुरावला. मात्र त्याच गावाने आता भाजपचे सदस्य निवडून देत विश्वास दाखवला आहे, त्यामुळे आता वेगळे सांगायची गरज नाही असे सांगून पाटील यांनी आगामी विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचे संकेत दिले आहेत.
१०० रुपयांचं काम यांनी ४० रुपयांत केलं.. मग असले रस्ते होणारच की..
दरम्यान दत्तात्रेय भरणे यांच्यावर टिका करताना महाविकास आघाडीच्या काळात रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे रस्ते कसले झालेत, तुम्हाला माहिती आहे असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. या सर्व कामांचे ऑडिट करणार असून १०० रुपयांचे काम ४० रुपयांत करण्याची पध्दत असेल तर ती कामे दर्जेदार कशी होतील असा सवाल उपस्थित केला आहे.