दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई – राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आई काळुबाईच्या दरबारात देवस्थानानेच सर्वानुमते नेमलेल्या सचिव, सहसचिव आणि त्यांच्या सतरंज्या उचल्यांनी विश्वस्तांचाच विश्वासघात केला आणि भाविकांच्या देणगीवर दरोडा टाकला. याची सखोल चौकशी सेवानिवृत्त न्यायाधिशामार्फत करण्याच्या मागणीसाठी मांढरदेव ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून या निवेदनात पुढे म्हटले आहे की, देवस्थान ट्रस्टचे सन २०२१ आणि सन २०२२ या काळातील लेखापरीक्षण करावे व सध्या अटकेत असलेले सर्व आरोपी किती वर्षांपासून देणगीवर डल्ला मारत होते याचा तपास करावा अशी मागणी केली आहे.
यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव देऊन, त्यास मान्यता घेऊन स्वतःच्या अधिकारात चौकशी पथक तयार करावे व चौकशी करून मांढरदेव ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी मांढरदेव ग्रामस्थांनी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मी यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालून मांढरदेव देवस्थान व ग्रामस्थांना न्याय देईन असे आश्वासन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी बोलताना जो कोणी यामध्ये आढळेल, त्याला अभय दिले जाणार नाही, निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी समिती स्थापन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू व देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक लेखापरीक्षण अहवाल तपासणीबाबत धर्मादाय आयुक्तांकडे प्रकरण पाठवू असे सांगितले.
दरम्यान यावेळी मांढरदेव ग्रामपंचायत सदस्य काळुराम पारटे, जीवन मांढरे, सागर(सरकार) मांढरे, प्रवीण मांढरे, गणेश बोबडे, बळवंत मांढरे, विशाल मांढरे, ऋषिकेश जाधव, परशूराम मांढरे, शंकर मांढरे इत्यादी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ उपस्थित उपस्थित होते.