दौंड : महान्यूज लाईव्ह
महावितरण कंपनीच्या होऊ घातलेल्या खासगीकरणास वीज कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. या विरोधात आज वीज कर्मचाऱ्यांनी पाटस ते दौंड अशी दुचाकी रॅली काढुन सरकारचे लक्ष वेधले.
अदानी इलेक्ट्रिकलने समांतर वीज वितरण करण्याचा परवाना मिळावा यासाठी वीज नियामक आयोगाकडे अर्ज दाखल केला असून अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला समांतर वीज वितरण करण्याचा परवाना देऊ नये त्या निषेधार्थ संयुक्त कृती समिती महावितरण कर्मचारी अधिकारी व अभियंता यांच्या वतीने बुधवारी (दि २१) दौंड उपविभागासमोर द्वार (जनजागृती )सभा घेण्यात आली.
तत्पूर्वी कामगारांनी पाटस ते दौंड महावितरण कार्यालयापर्यंत दुचाकी रॅली काढली. या वेळी कर्मचाऱ्यांनी “ऊर्जा क्षेत्र बचाव महाराष्ट्र बचाव” असा घोषणा देत केंद्र व राज्य शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रातील १६ कोटी जनतेच्या २ कोटी ८८ लक्ष विज ग्राहकांच्या मालकीचा हा वीज उदयोग जगला पाहिजे व टिकला पाहिजे, केवळ यासाठी ही लढाई असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
येणाऱ्या पुढील काळात तहसील कार्यालयावर मोर्चा व २३ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन विधानसभेवर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकरी, विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन वीज वितरण कर्मचाऱ्यांनी केले आहे. महावितरण कंपनीच्या दौंड येथील कार्यालयात
संयुक्त कृती समितीचे सर्व कामगार कर्मचारी व अभियंता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.