दिल्ली – महान्यूज लाईव्ह
कोरोनाचा उगम झालेल्या चीनमधून आता पुन्हा एकदा नव्याने एक चिंतेची बातमी आहे. चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसीमध्ये सरकारविरोधात असंतोष उफाळल्यानंतर सरकारने सर्वच निर्बंध काढून टाकले आणि कोरोनाच्या रुग्णांमध्ये महाभयंकर वाढ झाली. आता दिवसाला नव्हे तर तासाला रुग्णसंख्या दुप्पट होऊ लागली आहे, त्यामुळे चीन हैराण झाला आहे, तर अंत्यसंस्कारासाठी अगदी दिवसभर नातेवाईकांना प्रतिक्षा करावी लागते आहे.
चीनने ९० टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात ६० वर्षावरील केवळ १० टक्के लोकांचे लसीकरण झाल्याचे आता सांगितले जात आहे, परिणामी कोरोनाचा प्रसार अत्यंत वेगाने झाला आहे. राजधानी बिजींगमध्ये तर २४ तास अखंड अंत्यसंस्कार सुरू आहेत यासंदर्भात अमेरिकन शास्त्रज्ञ एरीक फिगेल डिंग यांनी एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर ही नवी भिती समोर आली आहे.
चीनमधील सर्व रुग्णालये सध्या रुग्णांनी भरून गेलेली आहेत. चीनमध्ये ओमायक्रॉनच्या बीए५.२ व बीएफ ७ या व्हेरियंटचे रुग्ण वाढले असून हजारोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या रुग्णांमुळे सध्या दवाखान्यांमध्ये जागा मिळेनाशी झाली आहे.
दरम्यान या उद्रेकामुळे भारतातही केंद्र सरकार सतर्क झाले असून भारतात तीन लशींमुळे लोकांमध्ये विशेष रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे, मात्र तरीदेखील आज दिल्लीत केंद्र सरकारची महत्वाची बैठक सुरू आहे. कोरोना रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना कराव्यात यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी तज्ज्ञांची बैठक आयोजित केली आहे.
दुसरीकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देशात पुन्हा मास्कसक्ती लागू होऊ शकते असे संकेत दिले आहेत. कोरोनाला देशाबाहेरच थोपविण्यासाठीची उपाययोजना सरकार आखत असून भारताने २२० कोटी लसीकरण केले आहे अशी माहिती डॉ. पवार यांनी आज दिल्लीत दिली.