बारामती – महान्यूज लाईव्ह
दौंडमधील बहुचर्चित अॅट्रॉसिटी, खूनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यातील आरोपी व दौंडचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्या अडचणी पुन्हा वाढल्या असून अटकेनंतर बादशहा शेख याने काल बारामतीच्या सत्र न्यायालयापुढे सादर केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
हा अर्ज फेटाळल्याने आता शेख याला मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल, अथवा दोषारोपपत्र न्यायालयात येईपर्यंत कारागृहातच वेळ काढावा लागेल. त्यामुळे आता बादशहा शेख अजून किती दिवस आतमध्ये राहणार याचा प्रश्न त्याच्या समर्थकांना पडला असेल.
बादशहा शेख याच्यासह २० जणांविरोधात दौंड पोलिसांनी कुंभारगल्लीतील एका मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात अॅट्रॉसिटी, खूनाचा प्रयत्न, विनयभंग असे विविध गुन्हे समाविष्ठ होते. दरम्यान बादशहा शेख फरार झाल्यानंतर चक्क रत्नागिरीहून भाजप आमदार नितेश राणे यांनी दौंडमध्ये येऊन मोर्चा काढला व बादशहा शेख याला अटकेची मागणी केली.
त्यानंतर बादशहा शेख राजस्थानमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला सापडला, तेव्हापासून तो अटकेत आहे. काल त्याच्या जामीनाची सुनावणी बारामतीत झाली. विशेष सरकारी वकील अॅड. प्रसन्न जोशी यांनी त्याच्या जामीन अर्जास विरोध केला. घटनेतील गुन्ह्याचे प्रमाण व गांभिर्य लक्षात घेता शेख यास जामीन देऊ नये, जामीन दिल्यास फिर्यादी व साक्षीदारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशा प्रकारचा युक्तीवाद त्यांनी केला. बचाव पक्षाचा व सरकार पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शेख याचा जामीन फेटाळला.