सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्याचं राजकारण भल्याभल्यांना समजेनासं झालं आहे.. त्यात मग आमदार, पदाधिकाऱ्यांचा काय दोष? सकाळी एकीकडे.. दुपारी दुसरीकडे.. संध्याकाळी थेट महाबळेश्वर असं असेल, तर कोण नक्की कोणाचा निष्ठावंत कसा समजेल? मागील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीवेळीही असंच झालं..शेवटी राष्ट्रवादीने सरपंचांची शिरगणती केली.. तेव्हा कुठे कोण कोणाचे हे समजले.. त्यातही दोघेतिघे पुन्हा समोरच्या बाजूचाही सत्कार स्विकारायला गेले होते.
काल अख्ख्या राज्याची निवडणूक झाली.. टिव्हीवरच्या बाया-बापडे घसा ताणू ताणू हे सरपंच या बाजूचे, ते सरपंच त्या बाजूचे असं सांगत होते.. कोणी ट्रॅक्टरवर नेत्यांना बसवत होते.. तर कोणी घोड्यावर..! मग राज्यात अमुक पक्षानं एक नंबर, तमुक पक्षानं दोन नंबर मिळवला असं सांगत होते.. इंदापूरात सुध्दा मतमोजणी झाल्यावर कोणी निवडून आलं, त्यापेक्षा भाजपचे नेते व राष्ट्रवादीचे नेते नेमके काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
नेहमीप्रमाणेच झालं.. भाजपने अगोदर १९ सरपंचांचा दावा केला.. मग राष्ट्रवादीने १५ जागांवर दावा सांगितला.. मग राष्ट्रवादीने जिल्ह्याची यादी प्रसिध्द केली, त्यात राष्ट्रवादी १२, भाजप ११ आणि ३ संमिश्र.. म्हणजे स्थानिक आघाड्यांचे सरपंच असा तुलनात्मक तक्ता मांडला.. पण ग्रामपंचायती २६ च आहेत.. आणि १९ अधिक १५ म्हणजे ३४ होतात.. इंदापूरचे हे गणित असंच आहे. ना पत्रकारांना ते विचारायला वेळ आहे..ना कार्यकर्त्यांना त्यामध्ये रस..!
आता जेव्हा पुन्हा दोन्ही पक्षांकडून सरपंचांची शिरगणती होईल, थेट समोरासमोर सरपंचांना उभं केलं जाईल, तेव्हाच समजेल.. कोण कोणाचे ते..! पण इंदापूर तालुक्याचं राजकारणच कळत नाही असं एक मोठ्ठे नेते काही वर्षांपूर्वी गंमतीने बोलून गेले होते.. त्याची अख्खी प्रचिती सध्याच्या काळाला येऊ लागलीय.. नेते स्वतःपुरतं बघतात आणि कार्यकर्ते चवचाल झालेत.. अशी एक विचित्र चर्चा नेहमीच इथल्या राजकारणाच्या बाबतीत झालीय.. तसंच काहीसं पाहायला मिळतंय. अजूनही कोणा सरपंचांनं समोर येऊन छातीठोकपणे सांगितलंच नाही की, आपण या पार्टीचे.. आपण त्या पार्टीचे..!
आता तेही बिनधास्तपणे सांगतील की नाही, माहिती नाही.. कारण बहुतेक गावांमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने व भाजपचे दोन गट आमनेसामने.. मग काय, दोन्ही गटातील विचार जुळणारे एकत्र आलेत आणि त्यांनी स्थानिक स्तरावर आपापले उमेदवार एकत्र करून पॅनेल केलेत.. आता गावच्या पातळीवर कुठे असतो पक्ष?.. पण टिव्हीवाल्यांना कोण सांगणार? त्यांना त्यांचं पॅकेज मिळालेलं असतंय.. मालक सांगेल, त्याप्रमाणे नगारा वाजवायचा..!
इंदापूरात सुध्दा असाच नगारा वाजतोय.. फक्त सगळ्यांना प्रश्न पडलाय.. आता वरचे ८ सरपंच कोठून आणायचे.. म्हणजे भाजपला त्यांचे १९ मिळतील..आणि राष्ट्रवादीला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे १५..! मुंबईतल्या भाजप-शिंदे युतीप्रमाणे कोण रात्रीच्या वेळी वेष बदलून कोणत्या पार्टीच्या नेत्याला मी तुमचाच असं सांगतोय, त्यावर ठरेल, कोण कोणत्या पार्टीचा खरा सरपंच..!
आता कोंडी अशीय की, तालुक्यात विद्यमान आमदार आहे.. अन दुसरीकडे राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचा माजी आमदार..! त्यातच एकाच पाणीपुरवठा योजनेवर दोघांनीही दावा केलाय.. मग आपण आताच निवडून आलोय.. आपलं सॅण्डविच व्हायला नको.. म्हणून स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांनी मदत केलेला सरपंच दोघांकडेही सत्कार स्विकारायला जाऊ शकतो.. नाहीतरी कुठं पक्षाच्या चिन्हावर बिचारा निवडून आलाय तेव्हा?