सांगली – महान्यूज लाईव्ह
गाव सुधारायचंच या ध्येयाने परदेशातील एमबीबीएस शिक्षण अर्धवट सोडून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वड्डी गावात आलेल्या यशोधरा महेंद्रसिंग शिंदे या तरुणीने सरपंचपदाची निवडणूक जिंकली आहे, तिची राज्यात चर्चा होती.
गावच्या विकासासाठी जॉर्जियातून आल्याचे सांगत यशोधराने ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शड्डू ठोकला. वयाच्या २१ व्या वर्षीच तिने गावचे सरपंचपद पटकावले असून आता खरी तिची कसोटी लागणार आहे. परदेशातील विकास आणि गावची गावगुंडी यात आपली कोंडी होणार नाही याची तिला खबरदारी घ्यावी लागेल.
राज्यातील ७ हजार ग्रामपंचायतीची निवडणूक झाली., मात्र चर्चा मिरज तालुक्यातील वड्डी गावची झाली. वड्डी हे पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात महेंद्रसिंग शिंदे यांची मुलगी निवडणूकीच्या आखाड्यात उतरली. शाळेत कॉमन टॉयलेट का? परदेशाप्रमाणे शिक्षणाच्या, शुध्द पाण्याच्या योजना गावकऱ्यांपर्यंत का पोचत नाहीत असा प्रश्न विचारत तिने गावकऱ्यांना जागे केले आणि ती जिंकलीसुध्दा.. फक्त ती एकटीच नाही, तर अख्खं पॅनेल गावात जिंकलं..!