शिरूर : महान्यूज लाईव्ह
मांडवगण फराटा ग्रामपंचायतीवर अखेर परिवर्तन झाले असून राष्ट्रवादीच्या ताब्यातील असलेली सत्ता खेचून आणत भाजपने सत्ता प्रस्थापित केली आहे.या ग्रामपंचायतीवर भाजपचे ज्येष्ठ नेते दादा पाटील फराटे यांच्या स्नुषा समीक्षा अक्षय फराटे कुरुमकर या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.तर दादा पाटील फराटे यांच्या पॅनल ने ११-६ असा दणदणीत विजय मिळवला आहे.
मांडवगण फराटा ही शिरूर तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायत मध्ये १७ जागेसाठी व थेट सरपंच पदासाठी अशा एकूण अठरा जागांसाठी निवडणूक पार पडली. सकाळी दहाच्या सुमारास शिरूर येथील मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष मतमोजणी ला सुरुवात करण्यात आली.
या वेळी दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. यात समीक्षा फराटे कुरुमकर या थेट सरपंच पदाच्या उमेदवार पहिल्या पासून मोठ्या फरकाने आघाडीवर होत्या. दुसऱ्या फेरीत त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मांडवगण फराटा या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी महिला आरक्षण असल्याने प्रथमच महिलांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. थेट सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी अनेकांनी फॉर्म भरले होते मात्र काहींनी माघार घेत शिवशक्ती ग्रामविकास पॅनल कडून समीक्षा अक्षय फराटे( कुरुमकर) यांना उमेदवारी देण्यात आली होती तर श्री वाघेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनल कडून शीतल सचिन जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती.
थेट निवडणुकीसाठी समोरासमोर लढत होत असल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली होती. दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांकडून विजयासाठी दावे केले जात होते. सुमारे आठ ते दहा दिवस जोरदार प्रचार करण्यात आला होता.या निवडणुकीत स्थानिक पातळीवर एकमेकांचे असलेले हेवेदावे विसरून सर्व गट एकत्र आले होते.
तर दादा पाटील फराटे, सुधीर फराटे इनामदार यांनी प्रचाराची धुरा सांभाळत पॅनल ची बांधणी केली होती.सत्ताधारी पॅनल च्या उमेदवाराचा अक्षरशः धुव्वा उडाला असून काही मातब्बर मंडळी ना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या दणदणीत विजयाने तसेच येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मांडवगण फराटा गटात आत्मपरीक्षण करावे लागेल असे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.