दौलतराव पिसाळ: महान्यूज लाईव्ह
मांढरदेव देवस्थानच्या दानपेटीमधील रोख रक्कम मोजत असताना देवस्थानचा सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे, कर्मचारी बळवंत ढेभे या तिघांच्या पोलिस कोठडीची मुदत काल (दि.१९ रोजी) संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी वाढवून दिली.
पोलिसांनी आजपर्यंत केलेल्या तपासात जवळपास रोख रकमेसह सोन्या- चांदीचे दागिने मिळून १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती सरकारी वकीलांनी दिली. त्याचबरोबर पुढील तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला.
न्यायालयाने त्यावर वरील तीन आरोपींना २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आता चोरी केलेले पैसे आरोपींनी कशा कशात गुंतवले आहेत त्याचा अधिक तपास पोलीस करणार आहेत. अशी माहिती
वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, तपास अधिकारी, सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी दिली. यातील चोरी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पोलिस कोठडीत ठेवलेला आयडीबीआयचा सेवानिवृत्त शिपाई राजेंद्र कदम, देवस्थानचा कर्मचारी सचिन मांढरे या दोन्ही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्या दोघांची रवानगी सातारा कारागृहात करण्यात आली आहे.