सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यात उजनी धरणातून अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. इंदापूर पोलीसांची शिरसोडी भागात रात्रीची गस्त चालू असताना त्यांनी तेथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो असा एकूण 5 लाख 8 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
इंदापूर पोलीसांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. रात्रीच्या वेळी उजनीतून वाळूची चोरी महसूल विभाग व इंदापूर पोलिसांना चकवा देत बिनधास्तपणे सुरू असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. पोलीसांनी वाळूचोरीवर कारवाई केली असली तरी वाळू सम्राटांनी डोके वर काढले आहे हे दिसत असून कोणाच्या आशिर्वादावर ही वाळूची चोरी होत आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस कर्मचारी अकबर बादशाह शेख व फौजदार धोतरे, चालक पोलीस हवालदार बालगुडे हे शिरसोडी (ता. इंदापूर) येथे रात्रीची गस्त करत होते. यावेळी शिरसोडी गावाचे चौकात एक टेम्पो (MH 45, AF 5684) हा इंदापूरकडे जाताना दिसला. पोलिसांनी टेम्पो थांबविला असता, चालकाने गाडी थांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, यात एक ब्रास वाळू आढळून आली. यावेळी पोलिसांनी टेम्पो मालक आकाश वसंत यादव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना मिळून आला नाही. टेम्पो मालक व चालकाने कोणताही परवाना नसताना उजनी जलाशयात अवैधरित्या वाळू उत्खनन केले.
यानंतर टेम्पोमध्ये भरुन वाहतूक करीत असताना मिळून आला. पोलिसांनी 5 लाखांचा एन्ट्रा टेम्पो (MH 45, AF 5684) व 8 हजाराची 1 ब्रास वाळू असा 5 लाख 8 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी टेम्पो चालक लखन हनुमंत रास्ते (वय 29), मालक आकाश वसंत यादव (दोन्ही रा. माळवाडी, ता. इंदापूर) यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे.
उजनी धरणातून अवैधरित्या होणारा वाळू उपसा बंद आहे. तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यामुळे वाळू माफियांची कोंडी झाली आहे. वाळू चोरीला लगाम बसला आहे. अशा वेळी चोरी चोरी चुपके चुपके वाळूची चोरी होत आहे. वाळूचोर कोणाच्या आशिर्वादावर चोरी करत आहेत, यावर हे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी नजर टाकावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.