बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत, या मागण्यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली, परंतु सरकारने त्याचा गंभीरतेने विचार केला नाही, त्यामुळे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघ तसेच अनेक संघटना 22 डिसेबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत.
राज्यभरातील सर्व पोलीस पाटील यात सहभागी होणार आहेत. हा मोर्चा महाराष्ट्र राज्य पोलीस संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील या मार्गदर्शनाखाली निघणार असून राज्यभरातील पोलिस पाटील या मोर्चात सहभागी होणार आहेत.
पोलिस पाटलांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मानधन वाढ, निवृत्तीचे वय 60वरून 65 वर्षे करण्यात यावे तसेच निवृत्तीनंतर पाच लाख रुपये ठोक रक्कम मिळावी, नुतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे, गृह व महसूल विभागात पदभरती करताना पोलिस पाटील यांना किमान पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा, शासनातर्फे पोलिस पाटलांचा पाच लाखाचा विमा उतरविण्यात यावा, तसेच पोलिस पाटलाचा मृत्यू झाल्यास कुटूंबातील व्यक्ती अनुकंपा तत्त्वावर घेण्यात यावे अशा अनेक मागण्या आहेत.
दरम्यान बारामती तालुक्यातील सर्व पोलीस पाटील या मोर्चासाठी सहभागी होणार असून यासाठी बारामती तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.