बारामती – महान्यूज लाईव्ह
कोर्टात एखाद्या आरोपीला जामीन राहील्यानंतर त्या जामीनदाराच्या शिधापत्रिकेवर शिक्का येतो.. मात्र काही जामीनदार त्या शिक्क्यालाही न जुमानता पळवाट शोधून पुन्हा पुन्हा जामीन राहतात.. त्यामुळे एकच जामीनदार अनेक आरोपींना जामीन राहतो.. बारामतीच्या न्यायालयाच्या लक्षात काल ही बाब येताच कोर्टाने तातडीने हे जामीनदार शोधून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि शहर पोलिसांनी तात्काळ तालुक्यातील ५ जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
रवींद्र गणपत कदम (रा. आमराई, बारामती), प्रभाकर भाऊ होळकर ( लोहारचाळ, होळ ता. बाराम्ती), नंदकुमार नारायण सस्ते ( रा. येळेवस्ती, माळेगाव ता. बारामती), राजेंद्र किसन लांडगे (रा. घोडेवस्ती, डोर्लवाडी ता. बारामती) व दशरथ आबाजी वाबळे (का. देऊळगाव रसाळ, ता. बारामती) या पाच जणांविरोधात हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पाच जणांनी पूर्वी कोणालातरी जामीन राहीले असूनही यापूर्वी कोणालाच जामीन राहीलो नाही असे प्रतिज्ञापत्र न्यायालयापुढे सादर केले होते. न्यायालयाचीच फसवणूक करण्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने पाचवे अतिरिक्त व सत्र न्यायाधिशांनी हा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी हा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी बारामतीच्या सत्र न्यायालयाचे सहायक अधिक्षक महेश दत्तात्रेय जोशी यांनी शहर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून भारतीय दंडविधान १९९, २०० नुसार हा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातून एकच बाब महत्वाची पुढे येते, ती म्हणजे कोर्टात कोणालातरी जामीन राहील्यानंतर नजरचूक करून किंवा पळवाट शोधून एकापेक्षा अधिक जणांना जामीन राहू नका. अन्यथा तुमच्यावरही गु्न्हा दाखल होऊ शकतो.