नामवंत कवी व निमगाव केतकी च्या केतकेश्वर विद्यालयातील कलाशिक्षक श्रीधर राऊळ यांचे हायस्कूल मध्येच हृदयविकाराने निधन..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – वास्तववादी जीवनावर अधोरेखित कविता करुन सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवणारे नामवंत कवी व निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मनमिळाऊ चित्रकला शिक्षक श्रीधर मारुती राऊळ यांचे काल विद्यालयातच हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.
शनिवारी सकाळी विद्यालय सकाळी भरत असल्याने शिक्षक श्रीधर राऊळ हे सकाळी वेळेत विद्यालयात आले. दरम्यान सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्यांचे सहकारी शिक्षकांनी स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तपासणी करुन स्थानिक डॉक्टरांनी त्यांना तात्काळ इंदापूरला उपचारासाठी दाखल करण्याच्या सूचना केल्या.
विद्यालयातील सहकारी शिक्षकांनी राऊळ यांना विलंब न लावताच तात्काळ इंदापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. श्री केतकेश्वर विद्यालयातील निमगाव केतकीतील अतिशय मनमिळावू व सर्व विद्यार्थ्यांना आपलेसे वाटणारे राऊळ हे मूळ देहुगावचे होते.
गेली चौदा वर्षे ते याच शाळेत शिकवत असल्यामुळे सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यांच्या निधनामुळे अनेक विद्यार्थीसह पालकांनाही धक्का बसला आहे. हसत खेळत चित्रकला शिकवणे व वेगवेगळ्या कविता करणे हा त्यांचा छंद होता.
“लढाई” हे व्हाट्सअपचे शेवटचे स्टेटस…!
चित्रकला शिकवणाऱ्या राऊळ सर हे कवी होते. त्यांनी एक जुनी लिहिलेली ‘लढाई’ ही कविता त्यांनी परवा त्यांच्या व्हाट्सअपच्या स्टेटसला ठेवली होती, आणि हाच त्यांचा शेवटचा व्हाट्सअप स्टेटस होता.