बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उत्तम शहर असल्याने इंदापूर, फलटण, दौंड, करमाळ्यासह राज्यभरातील अनेक भागातून नागरिकांची राहण्यासाठी बारामतीला पहिली पसंती मिळाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बारामतीत घडत असलेल्या घटनांमुळे येथील कायदा व सुव्यवस्थेला तडा गेल्याचे चित्र आहे. काल संध्याकाळी अनेक हॉटेल्स, पेट्रोलपंपावर कोयत्याने वार करीत धूडगूस घालणारी तरूणांची टोळी दहशत माजवताना दिसून आल्याने नागरिक भयचकित झाले.
बारामती शहरात पाटस रस्त्यापासून ते एमआयडीसी चौकापर्यंत ही दहशत माजविण्यात आली. ही जाणूनबुजून गुंडागर्दी करण्यात आली का? हे पोलिसांनी तपासण्याची गरज आहे. बारामतीत खंडणी गोळा करण्यासाठी काहीजण गेल्या काही महिन्यांपासून अशी कृत्ये करीत असल्याची चर्चा आहे.
काल चार ते पाच जणांनी हातात कोयते घेत शहरात धुमाकूळ घातला. पाटस रस्त्यावरील श्रॉफ पेट्रोलपंपावर २ हजार रुपयांचे पेट्रोल दुचाकीत टाकले. पैसे मागितल्यावर कोयते दाखवत वार केला. तो वार कर्मचाऱ्याने चुकवल्यानंतर शेजारील अन्य वाहनचालकाला तो हातावर लागला. त्यानंतर तेथे सर्वांची धावपळ उडाली.
त्यानंतर हे टोळके तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या परिसरातील हॉटेलमध्ये घुसले. तेथे तोडफोड करीत कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करीत होते. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांचेही कोयत्याने वार करीत नुकसान केले. अनेक हॉटेलच्या काचा, खुर्च्या तोडून नुकसान केले. या हल्ल्यादरम्यान दोघे जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी दोन संशयित गुंडांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी पाच जणांवर खुनाचा प्रयत्न व दरोड्याचे गुन्हे दाखल
बारामती पोलिसांनी संशयित आरोपी शामवेल जाधव, विशाल माने(दोघे रा. वसंतनगर, बारामती), प्रथमेश मोरे (रा. प्रगतीनगर), यश मोहिते व चैतन्य कांबळे या पाच जणांवर दोन वेगवेगळे दरोड्याचा व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.