सांगवी – महान्यूज लाईव्ह
सांगवी (ता.बारामती) येथे पतीसमवेत हॉटेल चालविणारी विवाहित महिला घरातून बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी शिरवलीच्या हद्दीत गवत आणण्यासाठी गेलेल्या महिलांना तिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान या महिलेच्या नातेवाईकांनी एकास मारहाण केल्याने महिलेच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
सांगवी येथे पतीसमवेत हॉटेल चालविणाऱ्या या मृत महिलेचे नाव सविता अप्पासाहेब सालगुडे (वय ४२ वर्षे) आहे. शनिवारी (ता.१७) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सविता सालगुडे यांचा मृतदेह आढळून आला. सविता या शुक्रवारी (ता.१६) रात्रीच्या वेळी राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या.
कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला, मात्र त्या आढळून आल्या नव्हत्या. त्यामुळे शनिवारीही त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र गावातील महिला गवत आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या, त्यावेळी शिरवली हद्दीत एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सविता यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटना स्थळी माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर महिलेचा मृतदेह रुई ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. मात्र तोपर्यंत महिलेचे नातेवाईक तेथे पोचले होते. त्यातील संतप्त नातेवाईकांनी एकाला बेदम चोप दिला. त्यातून परिसरात ही आत्महत्या नसून घातपात असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान रात्री उशीरापर्यंत यासंदर्भात गुन्हा दाखल झाला नव्हता.