सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील चाकाटीचे शाळेच्या आवारात काल अवचित घटना घडली.. साऱ्या गावात त्या घटनेची बोंब गेली. जगाला उपदेश करणाऱ्या तीन शिक्षकांमध्ये जुंपली.. दोघात आला तिसरा आणि आता विद्यार्थ्यांना विसरा.. अशीच परिस्थिती तिथे निर्माण झाली आणि एकमेकांची गचांडी धरण्यापासून ते एकमेकांना आस्मान दाखवण्यापर्यंत सारे हाणामारीचे फ्रीस्टाइल प्रकार तिथे पूर्ण झाले.
इंदापूर तालुक्यातील चाकाटीच्या शाळेत काल संध्याकाळी शिक्षकांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे आज तालुक्यात खळबळ उडाली. शाळा सुटण्याच्या वेळीच झालेल्या या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी नेमका व्हिडिओ काढला आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. या शिक्षकांची बदली होत नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवू असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.
शाळेतील शिक्षक सुभाष भिटे, शाळेतील शिक्षिका संजीवनी गरगडे व लाखेवाडी शाळेत असणारे त्यांचे पती उद्धव कुंडलिक गरगडे या तिघांमध्ये ही भांडणे झाली. विद्यार्थ्यांसमोरच ही भांडण झाल्याने विद्यार्थ्यांनीही कसूर ठेवला नाही. त्यांनी लागलीच फोटो आणि व्हिडिओ काढले. ते व्हायरल होताच पालकांनी देखील या शाळेमधील शिक्षकांची तातडीने बदली करावी अशी मागणी करणारे निवेदन तयार केले.