दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई – देशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या मांढरदेवी देवस्थानचा सचिव रामदास खामकर व सहसचिव लक्ष्मण चोपडे या दोघांना वाई पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेने राज्यभरातील भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मांढरदेव देवस्थानला भाविकांनी दिलेल्या लाखो रुपयांच्या देणगीवर गेल्या पाच वर्षांपासून हे दोघे डल्ला मारत होते. देवस्थानचा सचिव रामदास खामकर आणि कर्मचारी बळवंत ढेभे या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडे सुरवातीला चौकशी केली, त्या चौकशीतून बरेच काही उघड झाले. त्या दोघांनी वेळोवेळी पैसे चोरल्याचे पोलिस चौकशीत उघड झाल्यानंतर पोलिसांनी इतरांकडे आपला मोहरा वळवला आणि तब्बल पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी शितल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र तेलतुंबडे, हवालदार विजय शिर्के, हवालदार सोनाली माने, अजित जाधव, किरण निंबाळकर, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड यांच्या पथकाने कारवाई केली.
भाविकांच्या पैशाची चोरी करुन स्वत: मालामाल झालेल्यांना अटक करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. दरम्यान या आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून यातील संपूर्ण तपासातून सर्व आरोपी सापडेपर्यंत चौकशी कसून केली जाईल असे बाळासाहेब भरणे व रविंद्र तेलतुंबडे यांनी सांगितले.