इंदापूरचे पोलीस बहाद्दर; ७२ तासात लावला खुन्यांचा शोध!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील खोरोची येथे दयाराम नारायण कनिचे (वय ७०) व जनाबाई दयाराम कनिचे (वय ६०) यांना बेदम मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्यानंतर दयाराम कनिचे यांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेने प्रचंड संतापाची भावना होती. इंदापूर पोलिसांनी ७२ तासात या खुनाचा शोध लावला.
वृध्द दांपत्याच्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या घटनेत उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या दरम्यान लोखंडी रॉड आणि काठीच्या मदतीने अज्ञात चोरांनी या दांपत्याला बेदम मारहाण केली. जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटे घरात शिरले होते. त्यांनी घरातील चीज वस्तू चोरून नेल्या होत्या.
या जखमी वृद्ध दांपत्यास अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दयाराम कनिचे यांचे निधन झाले.
या घटनेत पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत खोरोचीतीलच हनुमान चौकात राहणारा रोहन उर्फ सोन्या शिवाजी जाधव (वय 19 वर्ष), खोरोचीतील खंडोबा मंदिराच्या पाठीमागे राहणारा नितीन बजरंग जाधव (वय 27 वर्ष) आणि माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथील पाटील वस्तीवर राहणारा तुषार दादासाहेब चव्हाण (वय 22 वर्ष) या तिघांना या खुनाच्या प्रकरणात अटक केली.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना पोलीस सूत्रांनी अशी माहिती दिली. गावातील एक वृद्ध जोडपे एकटे राहत असून, त्यांना जमिनीच्या व्यवहारातून पैसे येणार आहेत अशी कोणीतरी चुकीची माहिती या तिघांना दिली आणि या तिघांच्या डोक्यातील विकृत मेंदू वळवळला. व्यवहारातून पैसे येणार आहेत, तेव्हा त्यांना लूटल्यास कोणीच मदतीला येणार नाही अशी खात्री बाळगून या तिघांनी कनिचे दांपत्याला लुटण्याचा तीन महिने प्लॅन केला.
त्या दिवशी हे वयोवृद्ध दांपत्य घरासमोर झोपले असताना, जनाबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले आणि झोपेत या दोघांना बेदम मारहाण केली. ही मारहाण एवढी भयानक होती की, दयाराम यांचा उपचारादरम्यान त्याच दिवशी मृत्यू झाला.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील व पोलीस कर्मचारी विकास राखुंडे करत आहेत. या संपूर्ण गुन्ह्याच्या तपासाची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळके व इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
या पथकात सहाय्यक निरीक्षक सचिन काळे, फौजदार अमित शीद पाटील, शिवाजी ननवरे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, हवालदार सचिन घाडगे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, अजित भुजबळ, असिफ शेख, विजय कांचन, एम आय मोमीन, योगेश नागरगोजे, अजय घुले, धीरज जाधव, दगडू विरकर, चंद्रकांत जाधव, काशिनाथ राजापुरे, अक्षय सुपे, नानासाहेब आटोळे, सलमान खान, विशाल चौधरी व सहाय्यक फौजदार शिवाजी निकम यांचा समावेश होता.