नानाची टांग
काल बारामतीत पाटील फिरायला निघाले.. मेडीकल कॉलेजच्या रस्त्यावरून सुभद्रा मॉलकडे निघाले…बहुधा पाटलांना भिगवण रस्त्यावर जायचं होतं.. पण अचानक विक्रम-वेताळ भेटले, पाटलांना..! विक्रमादित्याने जवळजवळ तर आरोळीच ठोकली.. कसं काय पाटील बरं हाय का?…. काल जे ऐकलं ते खरं हाय का? पाटील दचकले.. आजवर कोणाची बिशाद नव्हती, पाटलांना असं म्हणायची..! मग काल काय घडलं? पाटील मनात दचकून गेले.. पर धीर सोडला नाही.. कारण गडी बारामतीचाच होता..! पाटलांनी विक्रम-वेताळाला ओळख सांगितली….!
नगरीत नगरी पुण्य आमुची… भिमथडीची बाराखडी..
उगीच बदनाम करू नगासा.. तुमच्याच चुका अन तुमचीच बिघाडी..!
हो, हीच ती बारामती ही.. आर्या अन शिवलिला..अमृताची..!
विकासाच्या वाटेवरची देशामंदी घालते रुंजी..!
बहुभाषिकांना देते भाकरी अन हमी रोजगाराची..
शांतता, समृध्दीची ओळख तिची, घडी आहे सुव्यवस्थेची..!
पण ते ऐकलं तरी विक्रमादित्य काही गप्प बसेना.. अजूनही जोरात हाळी देत विक्रम ओरडला.. अवं पाटील, ते राहू द्या.. काय झालं माहिती आहे का? म्हणजे काल जे ऐकलं ते हो..!
ऐका, विक्रमाची ही वाणी… लुटमारीची नवी कहाणी..!
पोलिस असता, नकोच चिंता, पर उपऱ्यांची नवी गाऱ्हाणी..!
अवचित आला उठून कोणी… म्हणे .. उघड ‘गे
‘ दार बये..!
पोलिस दचकले ऐकून सारे, मोठी बातमी ‘गे
‘ माये..!
क्योंकी एकाला लुटले रात्रीत अन लुटून, वो तिनो तो भाग गये..!
आता कुठं पाटलांना थोडं कळायला लागलं.. म्हणजे कोणीतरी तिघांनी कोणाला तरी लुटलं होतं.. ओके..! थोडा प्रकाश पडला.. मग विक्रमाने आडपडदा न ठेवता सांगितलं.. विक्रमादित्य सांगू लागला, पाटील, आता कोड्यात न बोलता तुम्हाला सगळंच इत्थंभूत सांगावं म्हणतो, काल म्हणे आटपाट नगरात तिघेजण एकाला लुटून बरंच काही घेऊन गेले.. त्याच्या लुटीची कहाणी ऐकताच गरीब बिचारे पालक हडबडले..
आपली पोरं रस्त्यावर असतात, मग रात्री अपरात्री या शहरातली कोणीतरी उडाणटप्पू.. सडकसख्याहारी.. गुंड येऊन आपल्या पोराला लुटतील या भावनेने त्यांची झोप उडालीय पाटील… मग पाटील आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर योग्य दिलं, तर तुमचं डोकं तुमच्या मानेवर… नाहीतर या तलवारीने ते उडवलंच म्हणून समजा!
विक्रमाने हाग्या दम दिला, तरी पाटील ढिम्मच.. पाटील काय कच्च्या गुरूचे चेले नव्हते.. पाटलांनी सबंध दुनियेत पॉवर असणाऱ्या मालकांच्या हाताखाली काम केल्यालं.. पाटलांनी दिर्घ उसासा घेतला.. पाटील बोलू लागले…विक्रमा..ऐक..
ही दुनिया हाय एक जत्रा.. इथं हौशी, नवशी सतरा..! चांगल्याची दुनिया इथली.. पण भल्याभल्यांना खतरा..! विक्रमा, तू जे ऐकलं, वाचलं.. त्याच्यापरीस थोडं उलटं घडलंय खरं.. पण अळिमिळी, गुपचिळी.. आणि तोंडावर बोट ठेवावं लागतं.. सगळंच चकाकतं.. ते सोनं नसतं..!
विक्रमा, कायद्याच्या या राज्यात ठकविण्याच्या तऱ्हाही वाढल्यात… ‘पोरी’ आमच्याकडं मिळत्यात म्हणून शहरांमध्ये गुन्हेगारी ‘एस्कॉर्ट
‘ चालत्यात.. त्यातून लूट केली जाते. आता त्याचा वाण नाही, गुण लागतोच, शेजारच्या गावांना..! पण म्हणून काय बदनामीचा डोंगर असा वाटेवर टाकतात का?
परवा जे काही झालं.. ती ‘गे
‘ म असू शकते.. एखाद्यावर उलटलेली..! पण ती ‘गे
‘ म माझ्या शहराची बदनामी करणारी ठरली, तर सगळीच मूठ आम्हीही उघडू.. आम्ही मूठ झाकलीय, आमचे कायद्याचे रक्षक सक्षम आहेत, म्हणून.. अन म्हणूनच म्हणतो विक्रमा…माझ्या गावाला लुटीचं शहर म्हणू नको… कारण ही तर आ बैल मुझे लूट म्हणणाऱ्याची लूट होती ‘गे
‘ माये..! कुणीतरी तिथं लुटला ‘गे
‘ माये.. त्याच्याशी आमचा संबंध नाही ‘गे
‘ माये..!
एवढं ऐकलं.. आणि विक्रमाने गडगडाटी हास्य केलं… विक्रमादित्य म्हणतो, पाटील तु्म्ही तर फारच तरबेज निघालात.. सरळ काही सांगितलं नाही.. आणि वाकड्यातही काही शिरला नाही..! पण ‘गे
‘ माये म्हणत बरंच काही सांगितलं.. पण पाटील, तुमच्याकडं या नव्या गुन्हेगारीची किड शिरलीय बरं.. सावध असा..! आता यावेळी तरी उत्तर दिल्यानं तुमचं मुंडकं शाबूत राहीलंय.. पण मी पुन्हा येईन..! असं म्हणत विक्रमाने तलवार घेतली.. ते धूड खांद्यावर घेऊन पाहता पाहता विक्रमादित्य मेडीकल कॉलेजच्या रस्त्यावरून भिगवण रस्त्यावर पोचला आणि दिसेनासा झाला..