भोर महान्यूज लाईव्ह
दोन दिवसांपूर्वी संतोष मुंढे या टिकटॉक स्टारचा वीजेच्या प्रवाहामुळे दुर्देवी मृत्यू झाला.. तर आज पुन्हा एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये भोर तालुक्यातील तब्बल ४ जणांना जीव गमवावा लागला. नदीपात्रात वीजपंप ठेवून तो सुरू करण्यासाठी गेले असता, अचानक बंद झालेला वीजपुरवठा सुरू होऊन तो पाण्यात उतरल्याने चार जणांना जीव गमवावा लागला..

निगडे धांगवडी गावातील विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे या बापलेकासह गावातील अमोल चंद्रकांत मालुसरे व आनंदा ज्ञानोबा जाधव या चौघा जणांचा वीजेच्या प्रवाहाने जीव घेतला. या अनपेक्षित व अचानक घटनेने संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांच्या पोटात भितीचा गोळा आलाच, मात्र निगडे धांगवडी गावाने आज अभूतपूर्व आकांत अनुभवला.

आज गुंजवणीच्या नदीपात्रात वीजपंप पाण्यात सोडताना अचानक गेलेली वीज आली आणि पाण्यात वीजेचा प्रवाह उतरल्याने सर्वांना वीजेचा धक्का बसला. वीजेच्या धक्क्याने त्यांना सावरायला काही क्षणाचीही उसंत दिली नाही.
एकाच वेळी चौघांचा जीव गेल्याने परिसरात प्रचंड धावपळ उडाली. संपूर्ण गावात हल्लकल्लोळ माजला. महावितरणच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसह पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत खेळ संपलेला होता. बोटीच्या सहाय्याने चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.