घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
कोबाड गांधी यांच्या ‘ फ्रॅक्चर फ्रिडम ‘ या पुस्तकाचा अनघा लेले यांनी केलेल्या अनुवादाला राज्यशासनाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री पुरस्कार जाहीर केला होता. आता राज्य सरकारनेच हा पुरस्कार अचानकपणे रद्द केला आहे. आता यावर मोठा वाद निर्माण झाला आहे.
कोबाड गांधी यांनी फ्रॅक्चर फ्रिडम हे पुस्तक लिहलेले आहे. कोबाड गांधी हे माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. या संघटनेवर सरकारने बंदी घातलेली आहे. या संघटनेनेचे सदस्य असलेले कोबाड गांधी यांना दहा वर्ष तुरुंगात काढावी लागली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहले. या पुस्तकाचा अनुवाद अनघा लेले यांनी केला. या अनुवादाला हा पुरस्कार जाहीर झाला होता.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोशल मिडिमावर याबाबत चर्चा सुरू झाली. यामध्ये या पुरस्कारावर टिकेची झोड उठविणयात आली. आता अचानक सरकारने हा पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत सरकारची बाजु मांडताना या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. साहित्य जगतात याचे पडसाद आता उमटत असून सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. या पुरस्कारासोबत जे इतर पुरस्कार दिले गेले होते, त्यापैकी शरद बाविस्कर आणि आनंद करंदीकर यांनी त्यांना जाहीर झालेले पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. निवड समितीचे सदस्य प्रज्ञा दया पवार आणि नीरजा यांनीही समितीमधून राजीनामा देऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते अजीत पवार यांनीही यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
सरकार बंदुकाना घाबरत नाही, पण कवी आणि साहित्यिकांना फार घाबरते हे इतिहासात अनेकदा सिद्ध झालेले आहे. कोणतेही सरकार आपल्या विरोधातील साहित्य दडपण्याचा प्रयत्न करते. येथेही कोबाड गांधी यांची कम्युनिष्ट विचारधारा हा पुरस्कार नाकारण्यामागील प्रमुख कारण दिसते आहे. याचसोबत तुरुंगातील तसेच न्यायालयीन व्यवस्था आणि या व्यवस्थेत सर्वसामान्य माणसाची ससेहोलपट यावर या पुस्तकावर भाष्य केले गेले आहे. हे अर्थातच सरकारला पटणारे नाही. या सगळ्याचा परिणाम पुरस्कार रद्द करण्यात झाला असावा.
या पुस्तकाचे नावच फ्रॅक्चर फ्रिडम असे आहे. हा पुरस्कार रद्द करताना सरकारने लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालून फ्रिडम ( म्हणजे स्वातंत्र्य ) कसे फॅक्चर ( म्हणजेच पंगू ) केले जात आहे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून दाखवून दिले आहे.