पुजा जाधवचे भुत
( पुजा जाधवचे भुत मला अनेकवेळा झोपेतून उठवते. मला कधी न्याय मिळणार म्हणून रडते. ओठात एक आणि पोटात एक असे वागणारी माणसे समोर आली की हळूच कानात मिस्कील हसते. अनेकदा हिरमुसले होऊन विचारत राहते, खरेच लोक विसरले मला. एक काळ होता, त्यावेळी मी प्रत्येकाच्या मनामनातली आग होतो. काही काळ एक ठसठसणारी जखम होतो, आता काय लोक मला पुर्णपणे विसरून गेले आहेत. सांग की, सांग की मला आता कधीच न्याय मिळणार नाही, असे विचारत राहते. त्यामुळे आता ज्यावेळी काही रोखठोक लिहण्याबोलण्याची वेळ येईल त्यावेळी या भुताच्या नावाने लिहावे असे मी ठरवले आहे. मग माझी झोपमोड होणार नाही आणि तेवढीच काहीजणांना आठवण राहील. आणि शेवटी असे परखड वागणे बोलणे माझ्यासारख्या सामान्य माणसाला थोडेच जमणार. असे एखादे भुत डोक्यावर बसले तर तरच ते होणार ना.)
महान्यूज लाईव्ह संपादकीय
गेले काही दिवस महापुरुषांच्या अवमानाचे आणि त्यावरच्या प्रतिक्रियांचे आहेत. कालच पुण्यात यावरून एक बंदही होऊन गेला. आणखी काही आंदोलने येऊ घातली आहेत. आपल्या राज्यात सध्या महापुरुषांचा अवमान हे एखाद्या बॉम्बसारखे स्फोटक प्रकरण होऊन बसले आहे. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनात अशावेळेस अनेक प्रश्न येतात. महापुरुषांचा अवमान नेमका होतो कधी.
कुणाच्या तरी भाषणात आलेल्या एखाद्या शब्दाने महापुरुषांचा अवमान होतो हे जर खरे असेल तर यापेक्षा फार मोठा अवमान त्यांचा दररोज होतो आहे. शिवछत्रपती, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घडलेले पुजा जाधव बलात्कार आणी खुनाचे प्रकरण हे याबाबतचे क्लासिक उदाहरण आहे. यातील आरोपीला वाचविण्यासाठी सर्व पक्षाचे पुढारी ज्या पद्धतीने एकत्र आले ते कुठल्या महापुरुषाचा आदर्श ठेवून वागत होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या या महापुरुषांचा अवमान झाला असे कोणाला का वाटले नाही. आजही जवळपास प्रत्येक पक्षात असे आरोप असलेले लोक आहेत. त्यांना शिक्षा करणे लांबच राहिले, त्यांना समर्थन देण्यासाठी आंदोलने केली जातात. शिवछत्रपतींनी हे खपवून घेतले असते का? स्त्रीशिक्षणाची जीवाचे रान करणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई अशा प्रकारावर मुग गिळून बसले असते का? शाहू छत्रपतींनी अशा व्यक्तीला शिक्षा न करता सोडले असते का?
याच महापुरुषांच्या फोटोखाली बसून सरकारी कार्यालयातून सर्रास लाच घेतली जाते. त्यासाठी लोकांची अडवणूक केली जाते, त्यावेळी महापुरुषांचा अवमान झाला म्हणून कोणी आंदोलनाचा पवित्रा का बरे घेत नाही.
महापुरुषांच्या जयंती पुण्यतीथीला या कार्यक्रमाशी लांबलांबूनही संबंध नसलेली फिल्मी गाणी लावून जो नाच चालतो, त्यामुळे त्यांचा अवमान होत नाही का. या महापुरुषांनी आपल्या आयुष्यात जो विचार पुढे नेला, जी जीवनसूत्रे अंगी बाणवली, ती आपल्या अंगी कशी येतील यावर काही न करता भाषणात चुकीचे शब्द उच्चारले गेले म्हणून जो गदारोळ माजवला जातो आहे, त्याच्याशी त्या महापुरुषांच्या विचाराचा काही संबंध आहे का? तसा संबंध असता चुकीचे शब्द उच्चारलेल्या व्यक्तींना पुस्तके वाचण्यासाठी पाठवली गेली असती. या विषयावर तज्ञ व्यक्तींना बोलावून संबंधितांचे प्रबोधनही केले असते. पण राजकारण्यांना केवळ महापुरुषांचे नाव घेऊन आपला राजकीय स्वार्थ साधायचा असतो. याला कोणताही पक्ष अपवाद नाही.
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. या सगळ्या संतांनी दांभिकपणावर मोठे कोरडे ओढलेले आहे. आताचे हे सगळे अवमान प्रकरणदेखील असेच दांभिकपणाचे आहे. एकजात सगळे पक्ष महापुरुषांच्या नावाखाली असे दांभिक राजकारण करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे अशा प्रकरणात सर्वसामान्यांनी किती वाहवत जायचे हे आपले आपणच ठरवलेले बरे.