दौंड: महान्युज लाईव्ह
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील पाटस येथील मस्तानी तलावाजवळ दुचाकीवरून कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत कामाला जात असलेल्या कामगार, माजी सैनिकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ही माहिती यवत पोलीसांनी दिली. त्रिंबक भुजबळ ( वय ४१, रा. वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे, पूर्ण नाव समजू शकले नाही) असे अपघातात मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. बुधवारी (दि.१४) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मस्तानी तलावाजवळ हा अपघात झाला.
त्रिंबक भुजबळ हे वरवंड वरुन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन दुचाकीवर कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील रिलायन्स कंपनीत कामाला जात असताना पाटस हद्दीत आल्यावर मस्तानी तलावासमोर पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन अपघात केला.
या अपघातात भुजबळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीची ही मोडतोड झाल्याने नुकसान झाले आहे. भुजबळ हे माजी सैनिक असून सध्या ते कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील रिलायन्स या कंपनीत कामगार आहेत. बुधवारी वरवंड येथील घरुन ते कामाला जात असताना सकाळी सात वाजण्याच्या आसपास पाटस हद्दीत आल्यावर हा अपघात झाला. दरम्यान,या अपघातामधील अज्ञात वाहन चालकाचा शोध यवत पोलीस व पाटस पोलीस घेत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.