शिरूर : महान्यूज लाईव्ह
मांडवगण फराटा ( ता.शिरूर ) येथील बी ई सिव्हील इंजिनीअरिंग झालेल्या उच्च शिक्षित युवकाने शेतीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले असून विषमुक्त शेतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.मल्चींग पेपरवर शिरूर तालुक्यात प्रथमच केलेल्या कांदा लागवडीची व अनोख्या शेतीच्या प्रयोगांची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
शिरूर तालुक्यात सध्या कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.पारंपरिक पद्धतीने कांदा लागवड करत असताना मांडवगण फराटा येथील उच्च शिक्षित युवक अक्षय दादासाहेब फराटे यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरत कांदा लागवड केली आहे.
याबाबत माहिती देताना फराटे यांनी सांगितले की,पारंपरिक व खर्चिक होणारी शेती व त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी मल्चींग पेपरवर दोन एकरवर कांदा लागवड केली. यासाठी लागवड पूर्व मशागत नांगरणी, रोटा व्हेटर, काकरी पाळी करून साडेचार फूट सरी काढण्यात आली. बेसल डोस खते बेडवर टाकून बेड सपाट करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक सरीबेडवर ठिबक ड्रिप करण्यात आले. त्यानंतर मल्चींग पेपरला होल पाडून चार फुटावर मजुरांच्या साहाय्याने लागवड करण्यात आली. मल्चींग पेपरवर पुढील 20 दिवस पाण्याचे नियोजन केले असून ड्रीपद्वारे विद्राव्य खते सोडली जाणार आहे.
चार इंचावर झालेली कांदा लागवड समांतर पद्धतीने करण्यात आल्याने लागवड खर्चात मोठी बचत झाली असून तणनाशक फवारणी केली जाणार नाही, तसेच खुरपणीचा ताण देखील वाचला आहे. इतर कांदा लागवडीपेक्षा या लागवडीत औषधफवारणी, खते यांचा खर्च देखील निम्म्यावर येणार आहे. मल्चींग पेपरवर लागवड झाल्याने एकरी १७ ते २० टन कांदा उत्पन्न कमी कालावधीत निघेल अशी आशा फराटे यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात कमी जागेत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी शेतीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार असून विषमुक्त शेतीसाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील शेतकऱ्यांनी देखील ठिबक व मल्चींग पेपरचा वापर करून पिके घेणे हे काळाची गरज आहे तरच शेती फायद्याची ठरणार आहे.