दौंड महान्यूज लाईव्ह
खरखटी भांडी घासण्यास सुनेला सांगितले, त्यावरून सुरू झालेला वाद पोराने आणि सुनेने आईबापांना मारण्यापर्यंत गेला..दुसरीकडे लग्न झाल्यापासून सातत्याने सासू-सासरे व नणंद आपल्याला जातीवाचक हेटाळणी करतात, म्हणून सुनेने थेट अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला. ही घटना दौंड तालुक्यातील काळेवाडी, बोरीबेल येथे घडली.
याप्रकरणी दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलिसांनी सुनंदा बाळासाहेब काळे (वय ५२) यांच्या फिर्यादीवरून मुलगा सागर बाळासाहेब काळे व सून सविता सागर काळे यांच्याविरोधात पोलिसांनी आईवडील, सासूसासऱ्यांना मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
यातील थोडक्यात माहिती अशी की, १२ डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास रात्रीची जेवण झालेली खरखटी भांडी घासण्यास सून सविता हिला सांगितले, त्यावरून सून सविता सासू सुनंदा हिच्यासमवेत हुज्जत घालू लागली. त्यावेळी मुलगा सागर हा पत्नी सविता हिची बाजू घेऊन आईशी भांडू लागल्याने वडील बाळासाहेब तेथे आले व समजावून सांगू लागले.
तर रागात सागर याने बाळासाहेब यांना हाताने मारहाण केली व आई सुनंदा हिला उचलून आपटले. त्यानंतर सून सविता हिने चुलीजवल पडलेली लोखंडी फुंकणी सुनंदा यांच्या डोक्यात मारली व दोघेही येथून निघून जा, नाहीतर तुम्हाला जिवंत राहू देणार नाही अशी धमकी दिली. त्यावरून दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरीकडे सून सविता सागर काळे हिच्या फिर्यादीवरून सुनंदा बाळासाहेब काळे, बाळासाहेब काळे व नणंद प्रियांका बिभिषण जगताप (रा. दुधवडी, कर्जत. जि. नगर) या तिघांविरोधात अनूसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये सविता काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सर्वांच्या संमतीने विवाह झालेला असतानाही सातत्याने आपल्याला जातीवरून सासू -सासरे व नणंद टोमणे मारते, विवाह झाल्यानंतर एक वर्षे आपल्यासोबत चांगले वागले, मात्र त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून जातीवाचक शिवीगाळ करू लागले व हाताने मारहाण करू लागले, १२ डिसेंबर रोजी माझी भांडी स्वयंपाकासाठी का घेतली अशी विचारणा करीत सासू व सासरे व नणंदेने मारहाण केली अशी फिर्याद सविता हिने पोलिसांकडे दिली. त्यावरून पोलिसांनी वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.