दिपक जाधव – महान्यूज लाईव्ह
हॉटेलमधील गल्ल्यातून पैसे चोरल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना सुपे येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात वडगाव निंबाळकर पोलिसांनी अधिक माहिती दिली. सुपे येथील हॉटेल श्रीकृष्णनजिक ही घटना घडली. या घटनेत श्रीराम भदुजी गहुकार (वय 42 वर्षे रा.अंजनगाव बारी ता.जि.अमरावती) याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी गहूकार याचा मुलगा विशाल श्रीराम गहुकार (वय 21 वर्षे धंदा नोकरी रा.अंजनगावबारी सेंट्रल बँके जवळ ता.जि.अमरावती) याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मच्छिंद्र दत्तात्रेय काळखैरे (रा. काळखैरेवाडी, ता. बारामती) यास अटक केली आहे.
यातील अधिक माहिती अशी की, काळखैरे याच्या हॉटेलमधील गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या संशयावरून काळखैरे याने श्रीराम गहुकार यास हाताने तसेच लाकडी दांडक्याने पोटाचे उजवे बाजुस बरकडीवर तसेच पाठीवर व शरीरावर इतर ठिकाणी जबर मारहाण केली. त्यात गहुकार याचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.