सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील खोरोची येथील वृद्ध दांपत्याच्या घरावर मध्यरात्री अज्ञातांनी खुनी हल्ला करत वृद्ध दांपत्यास गंभीर जखमी केले. वृध्द दांपत्याच्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
दयाराम नारायण कनिचे (वय ७०) तसेच जनाबाई दयाराम कनिचे (वय ६०) अशी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृध्दांची नावे आहेत. मध्यरात्रीच्या दरम्यान लोखंडी रॉड आणि काठीच्या मदतीने अज्ञात चोरांनी या दांपत्याला बेदम मारहाण केली. जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटे घरात शिरले होते. त्यांनी घरातील चीज वस्तू चोरून नेल्या आहेत.
सदर जखमी वृद्ध दांपत्यास अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दयाराम कनिचे यांचे निधन झाले अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सदर घटनेची इंदापूर पोलीस व बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी चौकशी सुरू केली असून पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी दयाराम कणीचे यांचा नातू संपत कनिचे (रा. चांदज ता. माढा जिल्हा सोलापूर) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.