सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांची काल सायंकाळी तडकाफडकी बदली झाली. बदली होताच काल सायंकाळी मुजावर यांनी इंदापूरचे पोलीस ठाणे सोडले. इंदापूरचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप सुर्यवंशी यांची नियुक्ती असल्याचे सुत्रांनी सांगितले.
इंदापूरला अधिकारी येण्यास फारसे इच्छुक नसतात अशी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा असताना आपल्या कार्यपद्धतीने मुजावर यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत पुणे जिल्ह्यात महत्त्वाच्या व मोठ्या कारवाया केल्या व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. तालुक्यात शांतता राखत इंदापूरकरांचा आदर मिळवणा-या मुजावर यांची तडकाफडकी बदली ही इंदापूरकरांना विस्मयचकित करणारी ठरली. त्यांची ही बदली प्रशासकीय बदली असली तरी अंतर्गत कुरघोडी च्या राजकारणाचा बळी आहे काय ? अशी चर्चा होत आहे.
काल सायंकाळी मुजावर यांची तडकाफडकी बदली झाल्याचे समजताच इंदापूर पोलीस ठाण्यात वातावरण शांत झाले. पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मुजावर यांची बदली झाल्याचे शल्य दिसून आले. अर्थात गेल्या काही दिवसांत पोलीस ठाण्यात अंतर्गत कुरघोडी बळावल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
साहेबांची बदली झाली त्यामुळे कदाचित काहींना आसुरी आनंद ही झाला असेल, मात्र मुजावर यांनी यावर ‘बदल्या होतच असतात’ असे सांगितले. पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप सुर्यवंशी यांची नियुक्ती असल्याचे सुत्रांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक मुजावर यांनी इंदापूर येथे केलेल्या संपूर्ण कार्यकाळामध्ये इंदापूर तालुक्याला पेट्रोलिंग हा शब्द माहिती करून दिला. इंदापूर पोलिस स्टेशन हे पेट्रोलिंगच्या कामगिरीतून इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले होते. टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंगची उत्तमरित्या जबाबदारी पार पाडली गेल्याने इंदापूर मधील सर्वसामान्य जनता इंदापूर पोलिस स्टेशनच्या कामावर समाधानी असल्याचे दिसून येत होते.
पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून दमदार कामगिरी करत अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणून सोडले होते. गेल्या 5 महिन्यातच अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या 7 कारवाया या अधिकाऱ्याने केल्या. यामध्ये तब्बल जवळपास कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.
सदर झालेल्या कारवाया या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कारवाया समजल्या जातात.अनेक चोरी प्रकरणे उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करणे, बेकायदेशीर गोमांस,दरोडा अशा गोष्टी नियंत्रित आणून एक प्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात इंदापूर पोलिस स्टेशन यशस्वी झाल्याचे दिसून येत होते.अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करून सामान्य लोकांना एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न मुजावर यांनी केला होता
मुजावर यांनी रात्रीच्या गस्तीसाठी स्वत: लक्ष घालून सुरू केलेला सायरन आता बंद होणार आहे. ही बाब नक्कीच इंदापूरकरांना जाणवणार आहे. अतिशय चोख पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडणा-या मुजावर यांच्या तडकाफडकी बदलीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विनंती बदली किंवा प्रशासकीय बदली असा बदलीचा शब्दप्रयोग जरी सांगितला गेला तरी ही बदली कुरघोडीने तर नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे.