दौंड : महान्यूज लाईव्ह
पुण्याचे पालकमंत्री व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दौंडमध्ये दलित संघटनांनी जोडे मारुन दहन केले. चंद्रकांत पाटील व भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान आज सकाळपासून दौंड शहरात कडकडीत बंद करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या या बंदला दौंड शहरातील व्यापाऱ्यांनी ही मोठा प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवून सहभाग दर्शविला.
महात्मा ज्योतिबा फुले , कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल गरळ ओकणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध नोंदवण्यासाठी व शाईफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवडच्या समता सैनिक दल व वंचित च्या कार्यकर्त्यावर दाखल केले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी दौंड वंचित बहुजन आघाडीसह दलित संघटनांनी सोमवारी (दि.१२) दौंड बंद ची हाक दिली होती.
त्यानुसार या बंद ला शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासून आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला होता. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व भाजप सरकारचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शहरातुन दुचाकी रॅली काढली.
महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पुष्पहार करून ही रॅली दौंड पोलीस ठाण्याच्या समोरील संविधान चौकात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध नोंदविला.
या पुतळ्याचे दहन करत भाजप सरकार व चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून संस्था व शाळा काढल्या असे वादग्रस्त केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विनी वाघमारे ज्येष्ठ नेते नागसेन धेंडे, राजेश मंथने आदिंनी आपल्या भाषणातून चांगलाच समाचार घेण्यात आला.
भाजप सरकारला व मंत्र्यांना सत्तेची मस्ती आली असेल तर त्यांची मस्ती दलित संघटना उतरवेल, यापुढे कोणत्याही बहुजन महापुरुषांचा अपमान व बदनामी यापुढे सहन केली जाणार नाही. असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.