इंदापूर: महान्यूज लाईव्ह
गावगाड्याची निवडणूक म्हटलं की बऱ्याचदा पक्षाच्या पलीकडे जाऊन ती लढवली जाते, निवडून आल्यानंतर मात्र प्रत्येकाचे राजकीय पक्ष जागे होतात. सध्या राज्यातील सात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये थेट सरपंच जनतेतून असल्याने काही प्रमाणात का होईना याला पक्षीय झालर आता आलेली आहे.
त्यातही इंदापूर तालुक्यात तर राष्ट्रवादी आणि भाजप मधून आता विस्तवही जात नाही. असे असताना भाजपच्या तालुकाध्यक्षांच्या स्टेटसवर आज राष्ट्रवादीचे गाणं वाजल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या.
इंदापूर तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष एड. शरद जामदार हे यावेळी स्वतःचा पॅनल घेऊन बेलवाडी गावच्या पंचवार्षिक निवडणुकीत उतरले असून त्यांच्या पत्नी मयुरी याच सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. ज्योतिर्लिंग पॅनलच्या माध्यमातून ते यावेळी गाव गाड्यामध्ये नशीब आजमावत आहेत.
आज मात्र त्यांच्या सोशल मीडियावरील व्हाट्सअप स्टेटस ने सगळीकडे चर्चा घडवून आणली. शरद जामदार हे भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांच्या विरोधात सत्ताधारी राष्ट्रवादीचा पॅनल आहे आणि शरद जामदार यांच्या व्हाट्सअप स्टेटस वर मात्र आज राष्ट्रवादीचे गाणे वाजले. साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा.. हे जे गाणे होते, त्या गाण्यातील काही ओळी जामदार यांच्या व्हाट्सअप स्टेटस ला आज ऐकायला मिळाल्या आहेत.
अर्थात ‘शिवारात राबणारा बोल बळीराजा, सांगतोय झटणारा कामगार माझा, माय बहिणीची आहे काळजाची हाक,… इथपर्यंतच हे गाणे ठेवलेले आहे. परंतु हे गाणे राष्ट्रवादीचे असल्यामुळे याची चर्चा होणं स्वभाविकच आहे..