दौंड : महान्युज लाईव्ह
महात्मा ज्योतिबा फुले ,कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल गरळ ओकणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील याचा निषेध नोंदवण्यासाठी व शाईफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवडच्या समता सैनिक दल व वंचित च्या कार्यकर्त्यावर दाखल केले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी दौंड वंचित बहुजन आघाडीने आज सोमवारी दौंड बंद ची हाक दिली आहे.
याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून संस्था व शाळा काढल्या असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
त्यानंतर विरोधक व विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टिका करत आंदोलन केले. पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली पोलीस यंत्रणेने या कार्यकत्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे त्वरित मागे घेण्यासाठी व महापुरुषांच्या अपमान केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दिनांक १२) दौंड शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीने दौंड बंद ची हाक दिली आहे.
यादरम्यान दौंड शहरातुन दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे, हा मोर्चा संविधान आल्यानंतर निषेध सभा घेण्यात येणार आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी दिली. याबाबत दौंड पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले असून या बंद मध्ये व दुचाकी रॅली मध्ये सर्व पक्षीय व सामाजिक, व्यापारी संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे