ज्येष्ठ नेते शरद पवार व सौ. प्रतिभा पवार यांच्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे स्वीय सहाय्यक व कवी सतीश ज्ञानदेव राऊत यांनी व्यक्त केलेली भावना !
सतीश ज्ञानदेव राऊत, बारामती.
‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात’ असं म्हणतात पण याचा प्रत्यय प्रत्यक्ष संसारात येतो. आणि ज्याला हा प्रत्यय येतो तो सांसारिक जीवनात खऱ्या अर्थाने सुखी आहे असे म्हणता येते. साहेबांनी अगदी विद्यार्थी दशेपासून सार्वजनिक जीवनात झोकून दिले त्यामुळे लग्नासाठी आवर्जून वेळ काढावं असं त्यांना कधी वाटलंच नाही. पण वडिलबंधू माधवराव यांच्या ओळखीतून विख्यात फिरकीपटू सदाशिव शिंदे यांच्या चार मुलींपैकी प्रतिभा यांच्याशी साहेबांचा विवाह ठरला. विवाहाचा मुहूर्त ठरवला गेला तो १ ऑगस्ट रोजीचा ! कुणी ठरवला माहित नाहीत नाही, पण ठरवणारांना तो दिवस टिळकांची पुण्यतिथी म्हणून पुण्यतेचा वाटला असावा. अशा ह्या पुणेरी पद्धतीच्या विवाह मुहूर्ताची वेळ मात्र साहेबांच्या सोईची होती. साहेबांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंतराव नाईक साहेब लग्नमंडपात पोचतील ती मंगलाष्टकांची वेळ ठरली. मात्र दोघे पुण्याला येताना खंडाळा घाटात एका अपघातामुळे कोंडी झाली आणि दूपारचे लग्न पाच वाजता पार पडले. झाले एकदाचे शुभमंगल ! आणखी उशीर झाला असता तर एव्हाना वहिनींना घेरी आली असती !
म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते. साहेबांच्या मागे त्यांना सगळ्या भावंडासोबत घडवणारी त्यांची आई होती. ‘शरदश्चंद्र पवार ’ ह्या व्यक्तिमत्वाची भक्कम जडणघडण आई शारदाबाईंनी केली. त्यामुळे साहेबांनी जगण्याचा धोपटमार्ग सोडून धकाधकीचा आणि धडाडीचा मार्ग स्विकारला. अशा ह्या आव्हानात्मक आणि अतिशय वेगवान वाटचालीत सतत सोबत राहून, संयम आणि धडाडीने साथ देणारी सहचारिणी त्यांना लाभली ती वहिनींच्या रूपाने !
वहिनी साहेबांसोबत केवळ सावली सारख्या नव्हत्या. कारण सावली सुद्धा अष्टोप्रहर सोबत नसते, ती संध्याकाळी मोठी होते आणि अंधार झाला की साथ सोडते. खऱ्या अर्थाने जीवनातील चढ-उतार, अंध:कार यात सोबत राहणारी माऊली असते. असं म्हणतात की, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते. साहेबांना लाभलेली पत्नी ही अशा अनंतकाळच्या मातेच्या रूपातली आहे. त्या साहेबांसाठी ‘प्रतिभा’, बहिणींसाठी ‘जिजा’ , पुतणे-पुतण्यांसाठी ‘काकी’,नातवंडांसाठी ‘आजी’ आहेत. परंतू शिंदेच्या पवार झाल्यानंतर साहेबांच्या भावंडांकडून त्यांना पहिल्यांदा ‘वहिनी’ असं संबोधलं गेलं. आम्ही बरेचजण तो प्रघात पाळून त्यांना ‘वहिनी’ असेच म्हणतो. ‘प्रतिभा’ नावाच्या व्यक्तिमत्वात अशी वेगवेगळी रूपे पाहावयास मिळतात आणि प्रत्येक भुमिकेला त्यांचा प्रमाणे खचितच कुणी न्याय दिला असेल.
वहिनींचे वडिल अकाली म्हणजे वयाच्या अवघ्या ३२ वर्षी वारले. चारही बहिनींचे पालनपोषण त्यांच्या आजोळी झाली. वहिनींच्या आजोबांची बडोदा संस्थानात ब्रिगेडियर राणे म्हणून एक वजनदार अधिकारी म्हणून ओळख होती. वहिनीच्या व्यक्तीमत्वात तो संस्थानी घरंदाजपणा , लष्करी शिस्त आणि वक्तशीरपणा आईच्या मार्फत आला. राणे मामा निवृत्त झाल्यावर पुण्यामधील प्रभात रोडच्या तेराव्या गल्लीत हे सगळे राहू लागले तसे वहिनींवर संस्कृती आणि विद्येच्या माहेरघरात विशुद्ध भाषेचे संस्कारही घडले. बडोद्याच्या संस्थानी आणि पुण्याच्या पेठेतील शहरी संस्कारात वाढलेल्या वहिनींसाठी लग्नानंतर बारामती मधील काटेवाडी खेड्यातल्या मोठ्या खटल्याच्या घरात जुळवून घेणे तसे आव्हानात्मक होते. घर मोठे आणि साहेबांच्या आई ‘बाई’ देखील कडक शिस्तीच्या होत्या. पण वडिलांच्या अकाली निधनाने जबाबदारीची जाणीव, प्रगल्भता आणि समंजसपणा हे गुण वहिनींच्या अंगात भिणले होते. त्यामुळे वहिनींनी पवारांच्या मोठ्या घरात केवळ जुळवून घेतलं नाही तर पवार कुटूंबाची मोळी आणखी घट्ट बांधली.
संसार म्हणजे रथाची दोन चाके ! साहेबांच्या संसाररथाचे दूसरे चाक साहेबांपेक्षा कोणत्याही बाबतीत उणे नाही ( शेवटी पुणे तिथे काय उणे म्हणतात ते काही उगीच नाही ! ). साहेबांइतका अथक प्रवास जगाच्या पाठीवर कुणी कदाचित केला नसावा. कारण १९६२ पासून साहेबांचे एका जागेवर पाऊल नाही. ते सतत प्रवास करीत असतात. साहेब त्यातल्या त्यात दिल्लीतील ६ जनपथ, मुंबईतील २,सिल्व्हर ओक, पुण्यातील १, मोदीबाग आणि बारामतीमधील गोविंदबाग ह्या ठिकाणी जास्त काळ राहतात. ह्या चारही ठिकाणीची व्यवस्था वहिनीच पाहतात. सगळीकडे घरकामासाठी घरगडी आहेत. पण त्यांच्यावर विसंबून चालत नाही. वाहनचालक,घरगडी यांच्या लहानसहान प्रश्नांची यादी केली तरी ती भली मोठी असते. इतरांची ती सोडवण्यात दमछाक झाली असती.पण वहिनी माऊलीच्या रूपात त्यांची काळजी घेतात. कामावर घेताना, वागणूक देताना कधीही कुणाची जात-पात, धर्म, प्रांत, परिस्थिती पाहिली जात नाही. ‘कष्टाळूवृत्ती, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा आणि टापटीपपणा असावा’ एवढीच काय ती अट असते. आमचंही काहीही गाऱ्हाणं, मागणं असलं तरी ते आम्ही वहिनींकडेच मांडतो. वहिनी साहेबांच्या कानी घालतात. वहिनी हाच आमच्यासाठी दवा आणि दूवा आहेत.
घरात क्षेम असेल तर राजकीय-सामाजिक जीवनात झोकून देणाऱ्या व्यक्तीसाठी ती बाब अधिक हितकारक ठरते. घरटं सुरक्षित असलं की गरूड गगनात कितीही उंच भरारी घेतो. दूर समुद्रात गेलेला खलाशी अजस्त्र लाटांचे हेलकावे सहन करतो, कितीतरी वादळे झेलतो कारण त्याला जहाज घेऊन सुरक्षित बंदरात पोचायचं असतं. पत्नी घरटं सांभाळणारी पक्षीण , पती नावाच्या जहाजासाठी सुरक्षित बंदर असते. पती अशा पत्नीला सांभाळत नसतो तर पत्नी त्याला सांभाळत असते.
साहेबांसारख्या समाजाशी नाळ जोडलेल्या नेत्याला आराम असा हा नाहीच. ते खूप निग्रही आहेत. त्यांचा कामाचा अट्टाहास इतका असतो की स्वत:ची चिंता करत नाहीत, तब्येतीची तमा बाळगत नाहीत की विश्रामाची पर्वा करत नाही. पण वहिनी साहेबांचे जेवण, झोप-आराम, औषधपाणी , प्रवास यांची त्या दूर असोत वा जवळ असोत सतत काळजी घेत असतात. आजारपण कुणाच्या नशिबी नसावे. घरातील एक व्यक्ती आजारी पडली की अवघे घर आजारी पडण्याची वेळ येते, शारिरीक पेक्षा मानसिक थकव्यानं नकोसं व्हायला होतं. साहेब आजारी पडले तर साहजिकच वहिनी काळजीत पडतात पण त्यांचे साहेबांची काळजी घेण्याकडे जास्त लक्ष असते. साहेब दवाखान्यात अॅडमिट असताना तासंन तास बसून राहणं, भेट घेणाऱ्यांनी काळजीपोटी व्यक्त केलेल्या भावनेला प्रतिसाद देणं, काहींचे सल्ले ( आवश्यक असोत अथवा अनावश्यक ) हसून ऐकून घेणं हे वहिनींना अंगवळणी पडलंय.साहेबांनी स्वत:ची तब्येत, देवधर्म-कुलाचार ह्या पुर्णपणे वहिनींकडे सोपवल्या आहेत.
साहेब राजकारणात असले तरी वहिनी राजकारणापासून कोसभर दूर राहतात. साहेब कधीही आणि कुठेही निघू द्या , आवश्यकता असल्यास त्या देखील प्रवासासाठी कायम तत्पर असतात ! साहेबांसोबत प्रवासात असल्या तरी त्या कार्यक्रमाला अभावाने जातात. राजकीय गोष्टींवर लक्ष ठेवतात पण राजकीय विषयांवर कधीही भाष्य करत नाहीत. साहेब निर्विकार राहतात, त्यांच्या मनातले कळत नाही असे राजकीय भाष्यकार म्हणत असले तरी वहिनी साहेबांचं मानसशास्त्र बरोबर ओळखतात. या मुत्सद्देगिरीचा उपयोग त्या साहेबांची काळजी घेताना करतात. ‘एखाद्या कार्यक्रमामुळे दूपारचे जेवण चुकेल’ असे सांगितले तरी साहेब त्याची पर्वा करीत नाहीत. वयाच्या ८२ व्या वर्षी देखील ते दूरच-दूर प्रवासाचा अट्टाहास करतात, खडतर दौरा काढतात. आमच्या सारखे त्यांना परावृत्त करू शकत नाहीत. पण वहिनी मोठ्या खुबीने आणि संयमाने त्यांना राजी करतात. वहिनी, सुप्रियाताई आणि नात रेवती ह्या तिघी एकत्र आल्यावर काम आणखी सोपे होते. वहिनी सोबत नसताना साहेब कुठेही पोचले तर पहिल्यांदा वहिनींना सुखरूप पोचल्याचा फोन करतात. वहिनींना काळजी लागून राहिली असेल याची जाणिव सतत त्यांच्या मनात असते.
वहिनींच्या व्यक्तिमत्वात एक घरंदाज रूबाबपणा आहे पण त्यांच्यात देशातील एका मोठ्या नेत्याच्या पत्नी असल्याचा कोणताही बडेजाव नाही. मंदिरात दर्शनाला, बाजारात खरेदीला जाताना गाडी नसली कि त्या ऐनवेळी रिक्षाने देखील प्रवास करतात. अगदी पायी देखील दूरवर चालत जातात. गाडीने जाताना ड्रायव्हरने बेल्ट लावला नव्हता तर त्यांनी ओळख न दाखवता स्वत: दंड भरला आहे. रस्त्याने ये-जा करताना कुणी आगाऊपणा केला तर त्याला जाणीव करून देऊन माफ केलं आहे. त्यांचा जनमाणसांतील राबता अगदी सहज असतो, त्यात कोणताही अविर्भाव नसतो. ही सहजता त्यांच्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती आहे.
आठवड्यापूर्वी ही सहजता मिडियातील काही मंडळींनी पाहिली. साहेबांच्या आत्मचरित्राच्या दूसऱ्या आवृत्तीचे काम चालू झाले आहे. त्याकरीता हि मंडळी सिल्व्हर ओक येथे दूपारचे जेवण करत होती. आत पाहूण्यांची गर्दी झाली म्हणून वहिनी बाहेर हातात ताट घेऊन घरामागच्या अंगणातील कट्टयावर बसून छानपैकी न्याहारी घेत होत्या. नोकरचाकरांशी गप्पा मारत होत्या. प्रताप आसबे आणि राजीव खांडेकरांनी ते पाहिले. दोघांनी ह्या साधेपणाला मनातून दाद दिली. “ वहिनी sss ! ” असे म्हणताना आसबेंच्या चर्येवर आश्चर्य आणि आदर स्पष्ट दिसत होता. कुणी कल्पना तरी करेल का ‘बडोद्याच्या संस्थानात वाढलेली आणि आता देशाच्या मोठ्या नेत्याची पत्नी असलेली स्त्री इतकी सहज व अहंभावहीन असेल !
पण वहिनींचं आजही सगळ्यात महत्वाचं काम असतं ‘पवार कुटूंबाची मोळी घट्ट ठेवणं’, ती विस्कटू न देणं, तुटू न देणं. वहिनी ‘कुणाची मनं तुटणार नाहीत’ याची काळजी घेतात, तुटू पाहणारी मनं जोडतात. वहिनी अशी एक वेगळी जोडगोळी (ग्लुईंग फॅक्टर ) आहे. त्यांनी नात्याची विण जन्मजात समजूतदारपणा, आपुलकी , काळजी आणि प्रेम ह्या भावबंधनांनी घट्ट बांधली आहे. कुटूंबात धुसफूस झाली असेल पण दूरावा कधी निर्माण झाला नाही. तिऱ्हाईताने गैरफायदा घ्यावा असा धूर झाला नाही की कुणाला धग बसली नाही. त्यांनी सासर, माहेर, साहेबांचे गणगोत, मित्र-आप्तजण आणि जनगोतावळा असं काही सगळं सांभाळलं आहे. म्हणून म्हणावसं वाटतं की साहेब नशिबवान आहेत.
पण साहेबांचा मनुष्याच्या कष्टावर विश्वास आहे , ते नशिबावर विश्वास ठेवत नाहीत की विसंबून राहत नाहीत. त्यांना नशिबवान म्हटलेलं आवडणार नाही. परंतू वहिनींमुळे त्यांना प्रतिभावान संबोधलेलं मात्र निश्चित आवडेल यात शंका नाही. साहेब आणि वहिनींच्या सानिध्यात आलेले माझ्यासारखे अनेकजण आहेत. आम्ही सारे मात्र आम्हाला नशिबवान म्हणवून घेतो. आज १२ डिसेंबर रोजी साहेबांचा ८२ वा वाढदिवस आहे आणि पाठोपाठ १३ डिसेंबर रोजी वहिनींचा वाढदिवस आहे. ह्या दोन्ही दिनी उभयतांचे मी मन:पुर्वक अभिष्टचिंतन करतो.