शिरूर – महान्यूज लाईव्ह
बाभूळसर बुद्रुक (ता.शिरूर) येथे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून शेतमुजरी करणाऱ्या महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस कसून तपास करत आहेत.
संगीता रमेश आडके (वय.४८, रा.बाभूळसर बुद्रुक) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून या प्रकरणी मयत महिलेचा मुलगा महेंद्र आडके याने दिलेल्या फिर्यादीनुसार शिरूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला ही दि.९ रोजी शेळ्या चारण्यासाठी गेली होती. परंतु रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी सदर महिलेचा परिसरात शोध सुरू केला. रात्री उशिरा संबंधित महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला.यावेळी ग्रामस्थांनी त्वरित पोलिसांना संपर्क साधला.
त्यानंतर मांडवगण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आला. यानंतर शनिवारी (दि.१० रोजी) शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुन्हा खुनाचे धागेदोरे मिळवण्यासाठी शोधाशोध सुरू केली.
शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्यासह पोलिस अंमलदारांनी तपासाची दिशा ठरवत दिवसभर तपास सुरू ठेवला. दुपारी श्वान पथक आल्यानंतर शुभु या श्वानाने परिसरात माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या घटनेतील विविध वस्तू ताब्यात घेण्याचे रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दरम्यान शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती कळताच शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर आदींनी घटनेची माहिती घेऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
खुनाची घटना घडल्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार,सहायक फौजदार राजेंद्र साबळे आदींनी घटनास्थळी पुरावे शोधण्यासाठी परिश्रम घेतले.तर पोलिस पाटील व ग्रामस्थांनी दोन दिवस पोलिसांना तपासकामी सहकार्य केले.
याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव हे करत आहेत. या घडलेल्या घटनेनंतर जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी घटनास्थळी पाहणी करून झालेली घटना दुर्दैवी असून आमचा पोलिस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र पोलिसांनी खुनातील आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन पीडित कुटुंबांला न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया दिली.