सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर शहरातून दररोज होणारी अवजड वाहनांची वाहतूक अखेर एका शालेय मुलीच्या जीवावर बेतली.काल शनिवारी दुपारी इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे- सोलापूर महामार्गावर आय कॉलेज समोर उसाच्या रिकाम्या ट्रॅक्टरने रस्त्यावरून जाणाऱ्या स्कुटीला जोरदार धडक दिली.या झालेल्या अपघातात ट्रॅक्टरने स्कुटीवरील निष्पाप शालेय मुलीला चिरडले.त्या अपघातात त्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला.सानिका राजेंद्र लिके (वय १६) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.विशेष म्हणजे सदर मयत विद्यार्थीनी शहरातील श्रीराम मंदिरात असणाऱ्या श्रावण बाळ अनाथ आश्रमात गेल्या आठ वर्षापासून राहत होती.
प्रशासनाच्या बेफिकीरीचा बळी ठरलेली विद्यार्थीनी इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे.या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने इंदापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अवजड वाहतुक शहरातून बंद होण्यासाठी अनेकांनी केलेली मागणी प्रशासनाने गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळेच शालेय विद्यार्थी आजही शाळेत जाताना असुरक्षित आहेत. शहरातील बाबा चौक ते आय कॉलेज समोरील रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवरच छोट्या व्यवसायिकांची झालेली प्रचंड अतिक्रमणे, त्यातच डांबरी रस्त्यावरच फळ विक्रेत्यांनी केलेला कब्जा, आणि दुचाकीला पार्किंग नसल्यामुळे रस्त्यावरच केलेली दुचाकीची पार्किंग यामुळे रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. त्यातच अवजड वाहने शहरातून गेली तर होणाऱ्या कोंडीमुळे शालेय विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जाताना दिसत आहे. ऊस कारखाने चालू असल्यामुळे ट्रॅक्टर बरोबर असणाऱ्या ट्रॉलीमधून उसाच्या मोळ्या रस्त्यावर पडत आहेत.ऊस ट्रॅक्टर शेजारून जात असल्याने विद्यार्थ्यांबरोबर सर्वसामान्य नागरिक ऊसाची मोळी डोक्यावर पडेल अशी भीती बाळगून चालताना दिसत आहे. ऊस कारखान्यावर खाली करून आलेला रिकामा ट्रॅक्टर ट्रॉली अतिवेगाने याच रस्त्याने जात आहेत, अशा विविध कारणामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यावर प्रशासन लक्ष देणार का? अनाथ आश्रमात राहत असल्यामुळे विद्यार्थीनीला न्याय मिळवून देण्यासाठी समाज अवजड वाहतूक बंद करण्यासाठी पुढे येईल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ऊस वाहतुकीमुळे अनेक वेळा वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसूनही संबंधित प्रशासनाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आज झालेला अपघात हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी असल्याची सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.अवजड वाहतुकीवर कारवाई करण्यास प्रशासनाविषयी इंदापूर शहरातून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी होत असताना संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होत आहे.
इंदापूर शहरातील आय कॉलेज समोर आज दुपारी साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला. मात्र निळ्या रंगाच्या स्कूटीवर निघालेली ही मुलगी आय कॉलेज समोरून सोलापूरच्या दिशेने निघाली असताना रिकाम्या ट्रॅक्टरने स्कुटीला अपघात केला.
शहरातील पुणे सोलापूर महामार्गावर शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, बस स्थानक, आठवडे बाजार आणि अनेक शासकीय व खाजगी दवाखान्यांमुळे हजारो नागरिकांच्या विशेषत: विद्यार्थ्यांची, वृद्धांची बेमाप वर्दळ असते. मात्र पादचारी मार्गावर अतिक्रमण आणि दुचाकी वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालण्याचा धोका पत्करावा लागतो. या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने हा आजचा अपघात ओढावला.
अनेकवेळा धोकादायक ऊस वाहतुकीवर, अवजड वाहनांवर कारवाई करण्यात यावी, शहरात अशा वाहनांना बंदी करण्यात यावी अशी संबंधित प्रशासनाला मागणी करण्यात आली, निवेदने देण्यात आली, बातम्याही प्रसारित झाल्या मात्र निगरगट्ट प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाला. इंदापूर शहरातून जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गावरून अनेक अवजड वाहने, उसाने भरलेले ट्रॅक्टर धोकादायक पद्धतीने वाहतूक करतात. मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा हा बळी गेला आहे. या अपघातामुळे निष्पाप बळी गेलेल्या आश्रमात राहणाऱ्या शालेय मुलीचा बळी गेल्यामुळे व्यथित झालेल्या शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक काटे यांनी पत्रकारांजवळ प्रतिक्रिया देत तीव्र नाराजी व्यक्त केली..नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असे सांगत काटे म्हणाले की,शहरातून ऊस वाहतूक बंद करा अन्यथा आमच्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काटे यांनी दिला.या अपघातास कारणीभूत ठरवत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.