बारामती – महान्यूज लाईव्ह
चोरीच्या शोधाच्या अनेक सुरस कहाण्या जन्माला येतात.. आवडीने वाचल्या जातात. बारामतीत मात्र या आठवड्यात एका सायकलचोरीच्या कहाणीने समाजातील अनेक पैलू पाहायला मिळाले.. सजग नागरीक असेल तर काय घडू शकते याचाही एक धडा पाहायला मिळाला, तर पोलिसांनी जनमित्र म्हणून काम केले, तर किती चांगला परिणाम घडू शकतो याचा प्रत्यय यानिमित्ताने आला.
तर ही कहाणी थोडक्यात अशी की, बारामतीतील एका शाळेत शिकणाऱ्या चौथीतील मुलाची एक सायकल चोरीला गेली. सायकल चोरीला गेल्याने पोरगा चांगलाच हिरमुसला. त्याच्या आईने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली. आता सायकल हा काही फार मोठा ऐवज नाही, म्हणून पोलिसांनीही तक्रार घेतली, मात्र कोणी जवळच्याने किंवा खोडी म्हणून नेली असेल तर शोधा असाही सल्ला दिला.
आवडती सायकल तर आता गेली.. मग आता नवी सायकल विकत घेता येणार नाही, त्याऐवजी आपण ओएलएक्स वरून जुनी सायकल विक्रीला असेल तर पाहू असे त्याच्या आईने सांगून पोराची समजूत काढली.
मग आईने ओएलएक्स वर बारामती परिसरात कोठे सायकल विक्रीला आहे का हे शोधण्यास सुरवात केली. बारामतीत चार पाच ठिकाणी सायकली विकायला होत्या. मात्र एका ठिकाणी तिचे डोळे चमकले. कारण जी सायकल चोरीला गेली होती, तीच सायकल विक्रीला मांडलेली होती.
तिने तडक पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना ही आपलीच सायकल असल्याचे पटवून दिले आणि मग तालुका पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी तातडीने एक पथकच त्या ठिकाणी पाठवले. त्यांनी अगोदर सापळा रचला आणि त्या घरातून तपास केल्यानंतर खरोखरच त्या चोरीला गेलेल्या सायकलसह आणखी एक चोरीची सायकल शोधून काढली.
आता एका चोरीचा शोध लागला होता. मात्र पोलिसांना एक मोठा धक्काच बसला, कारण चोर काही कोणी साधासुधा, भुरटा नव्हता, तर वकीली शिकणारा होता. वकीलीची पदवी शिकत असलेल्या चोरट्याने ही सायकल चोरली असल्याचे लक्षात आल्यावर पोलिस चक्रावून गेले.
मग या वकीलीच्या विद्यार्थ्याला रितसर अटक करण्यात आली. मात्र आता पुढला कायदेशीर सोपस्काराचा भाग आला. मग चोरीची वस्तू रितसर अर्ज करून कोर्टातून सोडवायची असते. या प्रक्रियेला काही वेळ लागतो. पोराला काही चैन पडेना. शिवाय कोर्टात जायचे म्हणजे काही खर्च येऊ शकतो अशी त्या मुलाच्या आईच्या डोक्यात शंका असावी.
दरम्यान ही बाब अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांना कोणीतरी सांगितली. त्यांनी ही सर्व कहाणी समजून घेतली आणि या महिला तक्रारदाराचे कौतुक केले. स्वतःचीच चोरीला गेलेली सायकल शोधणाऱ्या या महिला तक्रारदाराचा त्यांनी सत्कारही केला आणि कलम १०२ अंतर्गत पोलिसांच्या स्वतःच्या अधिकारात ही सायकल त्या मुलाच्या स्वाधीन केली, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता…!