पुणे महान्यूज लाईव्ह
आता कुठे गव्हाच्या पिकाने सुटकेचा श्वास सोडलाय… अगाप द्राक्षाच्या हंगामासाठी द्राक्ष उत्पादकाने खिसा मोकळा केलाय.. भुसारामध्ये हरभऱ्याची रोपे डुलू लागलीत.. वेलवर्गीय भाज्या सुखाने एक एक पान जोडताहेत.. तोच आता पुन्हा हिवाळ्यात पाऊस म्हणजे हिवसाळ्याची खबर घेऊन आलाय मेंडोस
वादळाचा सांगावा..!
मेंडोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या परिघात ११ ते १५ डिसेंबर दरम्यानच्या काळात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आणि तीच द्राक्ष उत्पादकांसह भुसार पिकाच्या उत्पादकांच्या चिंतेत भर घालणारी ठरली आहे.
ऐन हिवाळ्यात मेंडोस चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये व महाराष्ट्रात पाऊस बरसणार आहे. दुसरीकडे त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राज्यात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज केल्यामुळे गव्हावर करपा आणि द्राक्षावर भुरीचा फटका बसणारच याची खात्री आता निर्माण झाली आहे.
मेंडोस या चक्रीवादळाने तयार होणारी चक्रीय स्थिती दक्षिणेकडील राज्यात ऐन डिसेंबरमध्ये पाऊस पाडण्यास पोषक ठरणार असून काही ठिकाणी तुरळक व हलक्या सरी तर काही ठिकाणी हाच पाऊस मुसळधार स्वरुपाचा असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
त्यामुळे या अवकाळीचा फटका कोणत्या कोणत्या पिकांना बसणार याची चर्चा कृषी विभागात सुरू असून राज्याच्या नेमक्या कोणत्या भागातील क्षेत्र या चक्रीवादळामुळे प्रभावित होईल याचा नेमका अंदाज बांधण्याचे काम सुरू आहे.