सुनील महाडिक, पोलिस निरीक्षक, बारामती.
तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य म्हणायला खूप सोपं असतं.. पण त्यानुसार वागायचं म्हटलं की, खूप मोठा प्रवास असतो.. अनेकांना ते जमतच नाही.. मग नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीप्रमाणे कारणे शोधली जातात.. संगतच ठिक नव्हती.. माझा मुलगा तसा नव्हताच मुळी, मित्रांनी बिघडवलं… झोपडपट्टीतच होता, वातावरण नव्हतं हो चांगलं.. वगैरे.. वगैरे.. नाकर्त्याचे अनेक वार असतात.. कर्त्याला प्रत्येक दिवस शुभ असतो…
बारामतीतील बाल निरीक्षण गृहात राहिलेल्या एक अनाथ पोराची स्वतःला सनाथ केलेली आणि अख्ख्या महाराष्ट्रापुढे आदर्श निर्माण करणारी ही कहाणी..!
काही वर्षांपूर्वी अक्षर ओळख होण्यापूर्वीच अगदी लहान वयात बारामती येथील बाल सुधार गृहात अनिल माणिक जाधव दाखल झाला होता. त्याने अनाथ म्हणून बाल निरीक्षण गृहात नाव नोंदवले आणि बारामतीतच राहून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. कुणीही जवळचे नातेवाईक नाहीत. बाल निरीक्षण गृहातील इतर साथीदार हेच त्याची भावंडे व बाल निरीक्षण गृहातील सर्व अधिकारी वर्ग हेच त्याचे पालक.
ज्या काही सुविधा सुधारगृहात इतरांसाठी, सर्वांसाठी होत्या, त्याच सुविधा त्यालाही मिळाल्या. मात्र त्याचे सोने करीत त्याने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. लागलीच काहीतरी करिअर करायचे म्हणून त्याने आयटीआय चे शिक्षण घेतले. मग पुन्हा बारावी पूर्ण करून तो एका खाजगी कंपनीत नोकरीला लागला.
मग नोकरी करता करता त्याने एम ए पर्यंतचे शिक्षणही घेतले. शिक्षणाची आणि वाचनाची गोडी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.. अगदी एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख.. होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक … या गाण्याची आठवण व्हावी तसे.. रंगात रंगूनी रंग माझा वेगळा असेच प्रत्येक कृतीतून दाखवताना अनिल ने वाचनाला व शिकण्याला आपल्या आयुष्याचा एकमेव आधार बनवले.
केवळ उच्च शिक्षण घेऊनच तो थांबला नाही, तर कष्ट करत करत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणे सुरू केले. आणि त्यात यशही मिळवले. आज बारामतीच्या बाल निरीक्षण गृहातील अनिल मंत्रालयाचा सहायक कक्ष अधिकारी बनला आहे.
जेव्हा मला ही माहिती समजली, तेव्हा मलाही याचे आश्चर्य वाटले, मात्र आनंद अधिक झाला. कारण पोलिसांचा आणि बाल सुधार गृहाचा तसा फार जवळचा संबंध असतो.. विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या बाबतीत पोलिसांचा हा संबंध सतत येत असतो.. अशा वावटळीच्या दुनियेत काही नवीन करून समाजापुढे आदर्श निर्माण करतानाच विधीसंघर्षग्रस्त मुलांपुढेही अनिल यांनी आदर्श निर्माण केला आहे आणि तो निश्चितच आदर्शवत आहे.
बारामतीच्या संस्थेलाही माहिती दिली तेव्हा बाल निरीक्षण गृहाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, सचिव डॉ. अशोक तांबे व त्यांच्या समितीतील सहकाऱ्यांनी अनिल यांचे अभिनंदन केले. अर्थात मला हे सांगायचे आहे की, आज सुशिक्षित पालक असणाऱ्यांची मुलं या इंटरनेटच्या जाळ्यात अडकून सोशल मीडिया ॲप मध्ये रात्रंदिवस डोके घालून खऱ्या शिक्षणापासून भरकटत आहेत आणि अनाथ अनिल जाधव याने मात्र कुणाचाही डोक्यावर हात नसताना, आपुलकीची माया लावणारा कोणी नसताना आज शासनामध्ये एक उच्च अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि हीच गोष्ट समाजातील सर्व मुलांना आदर्शवत अशीच आहे.
अनिल माणिक जाधव यांचे यश हे अनमोल आहे. अनिल माणिक जाधव याला महाराष्ट्र शासनाने अनाथ प्रमाणपत्र महिला बालविकास खात्यामार्फत दिलेले आहे. यावर्षीपासून अनाथांना सुद्धा शासनाच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आलेले आहे. त्याचा लाभ अनिल माणिक जाधव याला झालेला आहे. परंतू आज पासून अनाथ अनिल हा सर्वसामान्यांचा नाथ बनेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. खरंच अनाथ ते नाथ हा प्रवास अनिल चा थक्क करणारा आहे त्याचा हार्दिक अभिनंदन.!
अनिल माणिक जाधव साहेबांना मानाचा मुजरा.🙏