बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी विद्यार्थ्याच्या खिशातील 15 हजार रुपयांची रक्कम लुटली. तसेच त्या विद्यार्थ्याला आडबाजूला नेऊन त्याला नग्न केले, त्याचे नग्नावस्थेत चित्रीकरण केले आणि नंतर गाडीवर बसवून नेऊन एटीएममधून १४ हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार या विद्यार्थ्याने पोलिसांकडे केली आहे.
4 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान ही घटना घडली. शासकीय महाविद्यालयात एमबीबीएस च्या द्वितीय वर्षात हा विद्यार्थी शिकत असून तो सुभद्रा मॉलमध्ये काही खरेदीसाठी गेला होता. तेथे खरेदी करून परतत असताना महिला सोसायटीच्या पुढील रस्त्याने तो ऑक्सिजन प्लॅंटच्या भिंतीनजिक आला असता दुचाकीवरून एक जण आला आणि त्याने त्याला शिवीगाळ करीत पॅन्टीच्या खिशातून १५ हजार रुपये काढून घेतले.
हे पैसे काढून घेत असतानाच आणखी एक दुचाकी तेथे आली व त्याना हा विद्यार्थी प्रतिकार करू लागताच तिघांनी मारहाण केली. त्यातील एकाने या विद्यार्थ्याला दुचाकीवर मध्ये बसवले व दुचाकी गोरड हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूला उसाच्या पिकाजवळ नेली.
तेथे पैसे मागतो काय असे म्हणून त्या विद्यार्थ्याला अंगावरील कपडे काढून नग्न करण्यात आले व त्याला उसाने मारहाण केली. त्याचे नग्नावस्थेतील फोटो काढून अजून पैसे दे, नाहीतर तुझे हे फोटो आम्ही सगळीकडे व्हायरल करू अशी धमकी दिली.
त्यानंतर त्याला त्या तिघांनी एमएच-४२ एएल ६३६ या क्रमांकाच्या दुचाकीवरून एटीएममध्ये नेले. तेथे त्याला पिन क्रमांक घेऊन दहा हजार रुपये व त्यानंतर पुन्हा ४ हजार ५०० रुपये काढून घेतले आणि त्या विद्यार्थ्याला तेथेच सोडून या तिघांनी तेथून पोबारा केला. या घटनेप्रकरणी या विद्यार्थ्याने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद केला आहे. बारामती तालुका पोलिसांनी भा द वि 394, 397, 504, 506 कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे..