पाटस टोल नाक्यावरील घटना!
दौंड : महान्युज लाईव्ह
पुणे – सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथील टोलनाक्यावर भरधाव ट्रकचालक टोल न भरता उलट टोलची लेन तोडुन भरधाव वेगाने निघून गेला. नंतर काही वेळाने दुचाकीवर ट्रक मालकाला घेऊन टोल नाक्यावर येऊन धारधार गुप्ती टोल कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पोटाला लावली व जीवे मारणाऱ्याची धमकी देत दहशत निर्माण केली.
याप्रकरणी वरवंड येथील तिघांजणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पाटस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली. हर्षद (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), संदीप गवळी, प्रदीप गवळी (दोन्ही रा.वरवंड ता.दौड,जि.पुणे) अशी गुन्हे दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
सोमवारी (दिनांक ५) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथील टोल प्लाझा कंपनीच्या टोल आकारणी करणाऱ्या लेनवर लेन मार्शल पदावर काम करणारे कर्मचारी विनोद बाळासाहेब भंडलकर हे काम करीत होते.
त्यावेळी सोलापूर बाजुकडून पुणे दिशेला विनानंबरची लाल रंगाची ट्रक त्याच्यावर मोठया अक्षरामध्ये गणेश कृपा असे लिहिलेली ट्रक भरधाव वेगाने टोलनाक्यावरती आली व टोल लेनचा बुम तोडून टोल न भरता पुढे जात असताना ट्रकला थांबविण्यासाठी बॅरीकेट लावले असता या ट्रक वाहन चालकाने ते ही उडवून पुणे बाजुकडे भरधाव वेगाने निघुन गेला.
त्यानंतर काही वेळानंतर दुचाकी ( क्रमांक एम.एच ४२ ए.ई ५७०८ ) या गाडीवर तिघेजण पुणे बाजुकडुन टोल नाक्यावरती टोल कर्मचारी लेन मार्शल भंडलकर याला तु माझ्या ट्रकला बॅरीकेट का आडवे लावले? असे म्हणुन हातामधील गुप्ती पोटाला लावली व ‘‘गाडी कोणाची आहे, माहीत नाही काय तुला? वरवंड च्या संदीप गवळी, प्रदीप गवळी यांची गाडी आहे. गाडीला अडवायची तुमची हिम्मत कशी झाली? परत गाडी अडवली तर आम्ही सगळयांना जिवे मारून टाकु, भोकसून टाकू अशी धमकी दिली.
याप्रकरणी टोल कर्मचारी विनोद भंडलकर याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने तिघांवर बेकायदा धारधार शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे जीवे मारणाऱ्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.