दौंड महान्यूज लाईव्ह
सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांनी नायलॉन मांजावर बंदी घातली.. पण थोड्या पैशासाठी हरामखोर दुकानदार तो मांजा आणून पोरांच्या गळी उतरवतात.. चोरीचा, बंदीचा म्हणून दोन पैसे अधिकचे कमावतात.. आणि बापाच्या पैशावर माज आलेली पोरं गुर्मीत दुसऱ्याचा पतंग काटण्यासाठी तो मांजा वापरतात.मात्र त्या मांजात एखादे घर उध्वस्त होते हे कधी यांना समजणार? आज दौंडमध्ये मोरी परिसरात एका निष्पाप दुचाकीस्वाराचा मांजाने गळा कापला..
दौंड शहरातील पन्नालाल यादव यांचा मांजा गळ्याला अडकून गळा कापल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. नगरमोरी चौकात कोणीतरी व्यक्ती नॉयलॉनच्या मांजाने पतंग उडवत असताना तेथून पन्नालाल यादव हे दुचाकीवरून कामाला जात होते. मात्र त्यांना तो मांजा न दिसल्याने पन्नालाल यांचा गळा कापला गेला. श्वासनलिका या मांजामुळे कापल्याने त्यांना दौंडच्या शासकीय रुग्णालयात नेऊनही उपयोग झाला नाही.
मूळचे गोरखपूर येथील परंतू दिडवितीच्या पोटासाठी कामाकरीता आलेले पन्नालाल यादव हे लिंगाळी भागातील पासलकरवस्ती येथे राहत होते. कंत्राटी बांधकामाशी ते संबंधित होते. ते नेहमीप्रमाणे आपल्या कामाला निघाले होते. त्यांच्या मनातही आले नसेल की, आपला हा शेवटचा दिवस ठरेल.
आता खरेतर मांजा उंडवणाऱ्याबरोबरच ज्या दुकानातून हा मांजा खरेदी केला गेला, त्या दुकानाचीही सखोल चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. अर्थात तेवढी मानसिकता पोलिसांची आहे की नाही हे येणारा काळ ठरवेल. शिवाय त्यांच्यावर कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल होईल यावरच या मांजाची दहशत बसेल की नाही याचा निकाल ठरेल.