वडार समाज झाला आक्रमक..आरोपीस अटक करा अन्यथा रास्ता रोको,तालुका बंद चा दिला इशारा..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : एकतर्फी प्रेम करुन एका युवकाकडून अल्पवयीन शालेय मुलीस शाळेत जाता- येता सतत त्रास देण्याचा प्रकार घडला. एवढेच नव्हे तर संबंधित मुलीने प्रेमास कसलाच प्रतिसाद दिला नाही. त्या युवकाने अखेर सदर मुलीला किराणा बाजार आणत असताना मुलीच्या नातेवाईकाच्या समक्ष चाकुने हल्ला करून तिला संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून या धक्कादायक प्रकाराने इंदापूर तालुक्यात शालेय मुली खरंच सुरक्षीत आहेत का ? असा सवाल निर्माण झाला आहे.
शालेय अल्पवयीन मुलीवर चाकूने केलेल्या हल्ल्यामुळे इतर मुलींच्या सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान सदर घटनेचे पडसाद तालुक्यात उमटले असून वडार समाज आक्रमक झाला आहे. या घटनेचा वडार समाजाच्या वतीने तीव्र धिक्कार केला आहे. अशा नराधमांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर पोलिसांनी जरब बसवावी व त्याबाबतीत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
हल्लेखोरावर आठवडयात कारवाई न झाल्यास सर्व वडार संघटना व समाजाच्या वतीने इंदापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा व दोन दिवसांनी इंदापूर तालुका बंदचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा वडार समाज बांधवांनी दिला आहे.
शालेय अल्पवयीन मुलीवरील हल्ला प्रकरणी रोहित हनुमंत चतुर याच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात दि.३० नोव्हेंबर रोजी दाखल गुन्हा दाखल केला गेला असून, पोलिसांना अद्याप आरोपीस पकडण्यात यश आले नाही. रोहित याने केलेल्या हल्ल्यामुळे पिडीत मुलगी जखमी झाली असून तिच्यावर बारामती येथील रुग्णालयामध्ये औषधोपचार चालु आहेत.
अल्पवयीन शाळकरी मुलींवर शाळेत येता – जाता असे हल्ले होणे हा प्रकार अत्यंत निंदनीय असून पालकांना चिंतन करायला लावणारा आहे. भविष्यात असे शाळकरी मुलीवर कोणत्याही नराधमाने असे भ्याड कृत्य करू नये याकरीता अशा प्रवृत्तींना पोलीस प्रशासनाने ठेचुन काढणे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
म्हणून अशा घटनांचा वडार समाजाच्या वतीने तीव्र धिक्कार करून अशा नराधमांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर पोलिसांनी जरब बसवावी व त्याबाबतीत योग्य ती कायदेशीर कारवाई अशी मागणी करण्यात आली असून कारवाई आठवडयात न झाल्यास सर्व वडार संघटना व समजाच्या वतीने इंदापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येऊन दोन दिवसांनी इंदापूर तालुका बंदचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन वडार पॅंथर संघटनेचे अध्यक्ष दयानंद इरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांना देण्यात आले आहे.विमुक्त जमाती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे, तसेच वडार पॅंथर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आण्णा पवार यांनी निवेदन संबंधीतांना पाठवले आहे.
सदर प्रकरणातील आरोपीस तात्काळ शोध घेऊन अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी. तसेच ॲड. उज्वल निकम यांच्यासारखे सरकारी वकील देऊन अशा आरोपींना मोक्कासारखी शिक्षा लागावी. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने पीडितेस मदत म्हणून आर्थिक तजबीज करावी अशी मागणी वडार संघटनेचे नेते आण्णा पवार यांनी केली आहे.
यावेळी विमुक्त जमाती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे, आमचे मेंबर मित्र परिवाराचे प्रमुख तसेच वडार पॅंथर संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष आण्णा पवार. रोहित पवार, आप्पा मंजुळे, ॲड. विजय पवार, पिंटू घोडके, आदी उपस्थित होते.