दौंड : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी परिसरात गजबजलेल्या चौकात एका युवकावर कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. पुर्ववैमनस्यातुन ही हत्या झाल्याची चर्चा आहे,मात्र हत्येचे नेमके कारण समजले नाही.
दरम्यान या युवकाची हत्या करून हत्यारा दौंड पोलीस ठाण्यात स्वतः हुन हजर झाला. मयूर चितारे (वय 22,रा. पासलकर वस्ती, दौंड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी अर्जुन स्वामी काळे (रा. इंदिरानगर ,भाजी मंडई ,दौंड) यास दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
दौंड शहरातील कुरकुंभ मोरी परिसरातील चायनीज सेंटर जवळ शनिवारी ( दि. ३) रोजी सायंकाळी६.३० ते ७ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. मयत मयूर आणि अर्जुन काळे याच्याशी काहीतरी कारणावरून वाद झाला. हा वादातुन अर्जुनने कोयत्याने मयूरच्या डोक्यावर ,पोटावर वार करून हल्ला केला.
पोलीस शिपाई अमीर शेख यांनी तातडीने मयुर यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेनंतर दौंड पोलीसांनी शहरात बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेचा अद्याप गुन्हा दाखल नसून दौंड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.