सलमान मुल्ला, उस्मानाबाद
जिल्ह्यातील कट्टर वैरी म्हणून प्रसिद्ध असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजपचे उस्मानाबाद तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यात आज पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी झाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्याधिकारी कार्यालयात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पीकविम्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. या बैठकीला नंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हेदेखील पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यास सुरुवात केली.
प्रशासनाकडे पंचनाम्याच्या पावत्या घ्यायला सांगत आहे मात्र पावत्याच नाहीत, तर शेतकऱ्यांची फसवणूक का केली? असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. यावेळी ओम राजेनिंबाळकर यांच्या आरोपांना उत्तर देताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचा “बाळा” असा उल्लेख केला.
त्यानंतर भडकलेल्या ओमराजे निंबाळकरांनी ‘तू तुझ्या औकातीत राहा, तुझी आणि तुझ्या खानदानाची औकात आणि संस्कार आम्हाला माहीत आहेत,’ असं म्हणत राणा पाटलांचा समाचार घेतला. हा वाद टोकाला गेल्यानंतर काही वेळ जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.