बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील कचरा तालुक्याच्या इतर गावांमध्ये टाकण्यास त्या त्या गावांनी विरोध केल्यानंतर अचानक इंदापूर तालुक्यातील निंबोडी ग्रामस्थ संतापले आहेत. त्यांच्या मते गावाच्या पाझर तलावाच्या ठिकाणी ठेकेदाराने कचरा टाकण्यास सुरवात केली आहे. या अनपेक्षित प्रकाराने गावकरी हवालदिल झाले असून त्यांनी ठेकेदारावर कारवाईची मागणी केली असून नगरपरिषदेलाही यासंदर्भात निवेदन दिले आहे.
दरम्यान यासंदर्भात ६ डिसेंबर रोजी लाकडी व निंबोडी येथील ग्रामस्थ व शेतकरी हे नगपरिषद व उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
हा कचरा ब्रिटीशकालीन पाझर तलावानजिक टाकला जात असून यासंदर्भात ठेकेदाराकडून दहशत माजवली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीने नगपरीषदेला २८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनानुसार पाझर तलावानजिक कचरा टाकला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायतीने कोणतीही ना हरकत दिलेली नसताना, कोणतीही चर्चा झालेली नसताना अशा प्रकारे कचरा टाकणे अन्यायकारक असून याची दाद आम्ही मागणार आहोत असे नागरिकांनी सांगितले.