जुन्नर – महान्यूज लाईव्ह
पारगाव पोलिस ठाण्यात अशी एक अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे, ज्यामध्ये एका २८ वर्षाय विवाहित युवकाने आपले जीवन संपवले, त्याचा केवळ सांगाडा पोलिसांच्या हाती लागला आहे. अर्थात तीन लग्न झाल्यानंतर तीनही बायका पळून गेल्याने नैराश्याच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचा संशय त्याच्या निकटवर्तीयांनी वर्तवला आहे.
पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहाडदरा गाव आहे. या गावच्या हद्दीतील जंगलात २९ नोव्हेंबर रोजी गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मानवी सांगाडा दिसून आल्याने ग्रामस्थांनी गावचे पोलिस पाटील माऊली कराळे यांना माहिती दिली.
कराळे यांनी अधिक माहिती घेतल्यानंतर गावातील शांताराम पवार यांचा मुलगा शेखर हा दिड महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याची फिर्याद पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्यामुळे खात्री करण्यासाठी कराळे यांनी पवार यांना बोलावून घेतले.
पवार यांनी घटनास्थळी जाऊन त्या सांगाड्याच्या खिशातील कागदपत्रे पाहिल्यानंतर आपलाच मुलगा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरून वाफगाव, मांदळेवाडी ता. खेड येथील शेखर पवार याने आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली.
दरम्यान शेखर याचा वयाच्या २८ वर्षापर्यंत तिसरा विवाह झाला होता. मात्र त्याच्या तीनही बायका त्याला सोडून गेल्याने त्याच्यामध्ये नैराश्य आले होते. त्यापूर्वीही त्याने आत्महत्या करण्याचा एकदोनदा प्रयत्न केला होता. त्यामुळे याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज त्याच्या वडीलांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी कालेकर करीत आहेत.